भोंगा आंदोलनाने रान पेटवणाऱ्या मनसेनं आता दूरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यात, मराठी भाषेतील कार्यक्रमासंबंधित मागणी करण्यात आली आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची 'प्रसारण भवन' येथे भेट घेऊन दिले आणि यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.