Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश, जाणून घ्या आत्तापर्यंत काय काय घडलं?

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश, जाणून घ्या आत्तापर्यंत काय काय घडलं?
, मंगळवार, 25 जून 2024 (20:50 IST)
पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणा-या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या सुटकेचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत
आरोपीच्या आत्यानं या प्रकरणी मुंबई हाय कोर्टात हेबियस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली होती.
 
त्यांची याचिका हाय कोर्टानं स्वीकारली आहे.
यासंदर्भात बोलताना वकील प्रशांत पाटील यांनी म्हटलं की, “या प्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आत्येनं पुतण्यासाठी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. जामीन मिळाल्यानंतरही
 
पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मुलाचे आई, वडील आणि आजोबा हे सध्या पोलीसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.”
 
त्यांनी पुढं म्हटलं की, आदेशात नमूद करण्यात आले आहे की, 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024 चे बालहक्क न्यायालयाचे जे आदेश आहेत, ज्यानुसार विधीसंघर्षित मुलाला ताब्यात घेण्यात आले होते ते अवैध आहेत. त्यामुळे ते आदेश रद्द झाले आहेत. त्यामुळे संबंधित मुलाला तातडीने सोडावे लागेल. सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला होता, तर आम्ही यात ज्युवेनाईल जस्टिस अॅक्टच्या कलम 12 नुसार कुठल्याही अल्पवयीन मुलाला असं अनधिकृतरित्या ताब्यात ठेवता येत नाही या मुद्द्यावर आम्ही याचिका केली होती.
 
पुण्यातील अल्पवयीन आरोपीला गाडी चालवायला दिलेल्या प्रकरणी त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात वडिलांना जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्यात त्यांना 21 जून रोजी जामीन मंजूर झाला होता.
इतर प्रकरणांमध्ये मात्र अद्याप जामीन नाही
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर झाल्याची माहिती, आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
 
18 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत कार चालवत, दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत.
 
या घटनेनंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावर न्यायालयानं काही अटी घालत जामीन मंजूर केला. या अटींवरुन जनक्षोभ उसळलेला दिसून आला होता.
 
या प्रकरणात पोर्शे कारनं दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दिलेला जामीन पुण्याच्या बाल न्याय मंडळानं रद्द केला होता. या अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिले होते.
 
त्यानंतर या प्रकरणी मुलाचे वडील आणि तो ज्या पबमध्ये दारु प्यायला होता, त्या ठिकाणच्या मॅनेजर, तसंच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून, त्यांना काल (21 मे) अटक करण्यात आली.
 
वयाची खात्री न करता मुलाला दारू दिल्याप्रकरणी पबच्या कर्मचाऱ्यांवर आणि अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्याप्रकरणी वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
 
कल्याणीनगर जवळ दोन पबमध्ये जाऊन या मुलानं दारु प्यायली होती, हे एफआयआरवरून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर रात्री उशिरा परवाना नसताना बेदरकारपणे कार चालवत त्यानं पल्सरवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती.
 
22 मे रोजी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीच्या वडिलांसह नितेश शेवानी आणि जयेश गावकरे या बारमालक आणि व्यवस्थापकांनाही तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
 
या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. त्यानंतर त्यांना 22 मे रोजी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
 
तसेच अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली होती. त्यांच्यावर कारवाई झाल्याचे वृत्त 27 मे रोजी समोर आलं होतं.
 
दोन डॉक्टरांना अटक
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टशी छेडछाड केल्याचा आरोप नोंदवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
 
ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावडे आणि डॉ. हरी हरनोर या दोन डॉक्टरांना या घटनेचा तपास करणाऱ्या पुणे गुन्हे शाखेनं अटक केली.
 
डॉक्टरांचे फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासावरून डॉ. तावडे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील यांच्यात फोनवरून बोलणं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
अपघात झाला तेव्हा कार अल्पवयीन आरोपी चालवत होता. त्याच्या रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यात त्यानं दारू प्यायली नव्हती असा उल्लेख होता. पण प्रत्यक्षात तो मुलगा एका पबमध्ये दारू घेत असल्याचं सीसीटिव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं होतं.
 
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरांना अटक केली आहे.
 
आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (27 मे) पत्रकार परिषद घेत या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली.
 
या प्रकरणात कलम 120 (ब), 467 (खोटी कागदपत्रं दाखल करून फसवणूक) आणि कलम पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलम 201, 213, 214 जोडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पोलिसांना रविवारी फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला. त्यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्याबाबत आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
"ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. ते फॉरेन्सिक विभागाकडं पाठवण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यावर आरोपीच नाव लिहून सील केले होते. पण प्रत्यक्षात ते आरोपीचे नमुनेच नव्हते,"असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.
 
या प्रकारानंतर पोलिसांनी नमुने सील केरीन फॉरेन्सिककडं पाठवलेल्या डॉक्टरांना ताब्यात घेतलं. त्यानंतर तपासात समोर आलं की, त्यांनी अल्पवयीन आरोपीचे नमुने घेतले होते. पण त्यांनी ते कचऱ्यात फेकले आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीचे नमुने ठेवत ते फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले, असंही पोलीस आयुक्त म्हणाले.
 
संबंधित डॉक्टरांनी हे सर्व डॉक्टर अजय तावडे यांच्या सूचनेवरून केलं होतं. डॉ.तावडे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करणार असल्याचंही अमितेश कुमार म्हणाले.
 
FIR मध्ये काय म्हटलं होतं?
अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलानं करड्या रंगाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली.
 
एफआयआरमधील माहितीनुसार, हा अपघात झाला, त्यावेळी या मुलाबरोबर त्याचे काही मित्रही होते.
 
शनिवारी (18 मे) रात्री उशिरा 10 ते 12 ते सगळे पार्टी करण्यासाठी पुण्यातील मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दारुचं सेवन केलं. पण एवढ्यावरच त्या सगळ्यांची पार्टी संपली नाही.
 
यानंतर रात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान हे सगळे तरुण मुंढवा परिसरामध्येच असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्याठिकाणीही या सगळ्यांनी दारु प्यायली होती, असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
त्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास करड्या रंगाच्या एका महागड्या कारमधून जात असताना दुचाकीला त्यांनी धडक दिली. त्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.
 
या कारच्या दोन्ही बाजूलाही नंबर प्लेट नसल्याचा उल्लेखही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे, तर कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीचं वय 17 वर्षे 8 महिने असल्याचाही यात उल्लेख आहे.
 
'या' 5 अटींवर झालेला जामीन मंजूर
बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. पण न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होता.
 
कोर्टानं कोणत्या अटी घातल्या होत्या ?
 
1) अल्पवयीन आरोपीला 15 दिवस वाहतूक पोलिसाबरोबर चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागेल. वाहतुकीचे नियम समजून घेत, अहवाल तयार करुन आरटीओला सादर करावा लागेल.
 
2) रस्ते अपघात आणि त्यावरील उपाय याबाबत 300 शब्दांचा निबंध मुलाला लिहावा लागणार आहे.
 
3) अल्पवयीन आरोपीला दारु सोडण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील.
 
4) अल्पवयीन मुलाला दारुपासून सुटका करून घेण्यासाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राची मदत घ्यावी लागेल.
 
5) भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
 
आरोपी अल्पवयीन आहे का, हे तपासणार - पोलीस
या संपूर्ण प्रकरणावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
 
आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला जामीन मिळाला, असं अमितेश कुमार म्हणाले. मात्र, याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले.
 
अमितेश कुमार यांनी सांगितलं की, "हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे अगदी स्पष्ट आहे. या प्रकरणामध्ये कोणालाही वाचवण्यात येणार नाही.
 
"मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवरही कारवाई केली जाईल."
 
मुलाचे वडील आणि दारु देणाऱ्या पब मालकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्स्ईज डिपार्टसोबत काम केलं जाईल असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.
 
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडं सोपविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
 
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का? हे त्यातून समजेल, असंही ते म्हणाले.
 
कठोर कारवाईचे आदेश दिलेत - फडणवीस
बेदरकारपणे गाडी चालवून दोन जणांचे जीव घेतल्याच्या घटनेप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.
 
देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करुन याप्रकरणी माहिती घेतली. तसंच कठोर कारवाईचे आदेश दिले.
 
आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
 
या प्रकरणात आरोपीला विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून तथ्य असल्यास तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचंही फडणवीस म्हणाले.
 
राजकीय प्रतिक्रियांना वेग
पुण्यातील या घटनेनंतर वेगानं राजकीय प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली आहे.
 
भाजपनं याप्रकरणी सोमवारी (20 मे) पुणे पोलीस आयुक्तांना ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. अशा प्रकारांना नाईट लाईफ संस्कृती कारणीभूत असल्याचं भाजपनं या पत्रात म्हटलं आहे.
 
अशाप्रकारे 'नाईट लाईफ संस्कृती'ला खतपाणी घालणाऱ्या पबवर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे भाजपनं केली आहे.
 
पबमधील डीजेवर लावण्यात येणारी गाणी, चौकांमधील हुल्लडबाजी यावर आळा घालण्याची मागणीही भाजपनं केली आहे.
दुसरीकडे, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिट ॲण्ड रन प्रकरणी आंदोलन करत पब्ज आणि बारवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं.
 
कायदा काय सांगतो?
या संपूर्ण घटनेच कायदेशीर बाजू काय आहे, हे आम्ही वरिष्ठ विधिज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याकडून जाणून घेतली.
 
त्यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाला दारु देणाऱ्या पब चालकासह वाहन देणाऱ्या पालकांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोटर वाहन कायदा 199 अ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
 
मुलगा चालवत असलेल्या कारला नंबरप्लेट नव्हती. त्यामुळं या प्रकरणी नव्या कायद्यातील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास पालकांवर गुन्हा नोंद करण्यात येतो आणि शिक्षाही पालकांना होऊ शकते.
 
या कायद्यांतर्गत गुन्हा एखाद्या अल्पवयीन मुलाने केला असल्यास, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची नोंदणी 12 महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द केली जाईल. तसंच गुन्हा अल्पवयीन मुलाने केला असेल तर, तो वयाची 25 वर्षे होईपर्यंत शिकाऊ परवाना मिळण्यास पात्र राहणार नाही.
 
गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलाला किंवा बालगुन्हेगाराला कायद्यात दिलेल्या दंडासह शिक्षेची तरतूद असेल. तर बाल न्याय कायदा, 2000 च्या तरतुदींनुसार कोणतीही कोठडीची शिक्षा सुनावली जाऊ शकते. भारतीय न्याय संहितेनुसार ही शिक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार गटाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा शरद पवार गटाचा दावा, शरद पवार म्हणाले-