राज्यात रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांसह आता कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली आहे.त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या गावातील घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाही शिरलं आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी ५३ फुटांवर गेल्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली आहेत. २०१९ च्या महापुरातही ही गावं पाण्यात बुडाली होती. त्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचं आवाहन रेस्क्यू टीमकडून करण्यात येत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसंच कोल्हापूर शहरातून महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात झाले आहेत.नदीच्या पाणीपातळीत अशीच वाढ होत राहिली तर परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे.
पंचगंगा नदीची धोक्याची पातळी ४३ फुटांवर आहे. ही पातळी पंचगंगेनं केव्हाच ओलांडली आहे.त्यामुळे शहरातील दुधाळी,उत्तेश्वरपेठ,शुक्रवारपेठ, सिद्धार्थनगर,रमणमळा,जाधववाडी, कदमवाडी,बापट कॅम्प, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी कामगार चाळ,व्हीनस कॉर्नर परिसरातील शेकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. दुसरीकडे आंबेवाडी आणि चिखली गाव पाण्याखाली गेले आहेत. या गावात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम कालपासून कार्यरत आहे.आतापर्यंत दोन्ही गावातील अडीचशे ते तीनशे नागरिकांना बाहेर काढलं आहे. मात्र, अद्याप काही लोक घरात असल्यामुळे त्यांना घराबाहेर पडण्याचं आवाहन या टीमकडून करण्यात येत आहे.