ज्या गोदावरी मध्ये स्नान केल्यानंतर लाखो पापांचा नाश होतो,त्याच गोदावरीचं पाणी आता स्नान करण्या लायक नसल्याचा धक्कादायक निर्णय हरित लवाद ने दिल्यामुळे नाशिक महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीला जाऊन मिळणाऱ्या जलस्रोतामध्ये पालिकेचे सांडपाणी सोडणे रोखण्यास अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला सुनावले आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडले जात असल्याचे लवादाने म्हटले आहे.
दर बारा वर्षांनी नाशिकच्या ज्या रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्या रामकुंडातील पाणी पिण्यासाठी तर सोडाच, मात्र साधं स्नान करण्यासाठी देखील योग्य नसल्याचा निर्वाळा हरित लवाद न दिला आहे. हरित लवादच्या या निर्णयामुळे महापालिकेला मोठा धक्का बसला आहे..लाखो भाविक ज्या पाण्याला तीर्थ म्हणून प्राशन करतात, ज्या पाण्यात तीर्थ म्हणून स्नान करतात, ते पाणी आता योग्य नसल्याचा निर्णय हरित लवाद ने दिल्याने लाखो भाविकांच्या श्रद्धेला देखील मोठी ठेच पोहोचली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की दरदिवशी ४५ ते ५० लाख लिटर सांडपाणी तयार होते. मात्र, केवळ १० लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित ३५ ते ४० लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते. या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून, ते पाण्याच्या गुणवत्तेच्या प्राथमिक निकषांनुसार अंघोळीसाठीही योग्य नाही. मात्र, मनुष्य आणि अन्य प्राणी हे पाणी पित असून, त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे लवादाने म्हटले आहे.
दरम्यान नाशिक शहरातील बंद असलेले मल-जल निसरण केंद्र, मनपा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कंपन्यांकडून गोदावरीत सोडण्यात येणारे विषारी मल-जल, याशिवाय अनधिकृत बांधकामांमुळे गोदावरीत होणारे अतिक्रमण यामुळे गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आले असून,यामुळे महापालिका प्रशासन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकच्या गोदावरीचे पावित्र्य राखण्यात अपयश आल्याने, महापालिकेवर चहू दिशांनी टीका होते आहे..
नमामी गोदा,स्मार्ट सिटी,प्रदूषणमुक्त गोदा या सारख्या अनेक घोषणा देऊन गोदावरीचे पावित्र्य संवर्धन केलं जाईल असा दावा करणारे लोकप्रतिनिधी कुठं गायब झालेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शिवाय गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च झाला असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.