पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामध्ये बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांचाही अर्ज दाखल करण्यात आलेला होता. मात्र आज सतीश काकडे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी सतीश काकडे म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे या बँकेचे संचालक मंडळ निवडणुकीसाठी अ वर्ग सोसायटी प्रतिनिधी या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर माझी आणि अजित पवार यांची सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यावर पवारांनी काही विषय मार्गी लावले आहेत व इतर सर्व विषय मार्गी लाऊन देतो, असे आश्वासन दिलेले आहे. पुणे जिल्हा बँक ही जिल्ह्याचा आर्थिक कणा असल्याने त्या बँकेवर प्रतिनिधी म्हणून अजित पवारांसारखा कणखर नेता असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण पाहतो की बऱ्याच जिल्हा बँका सक्षम नेतृत्व नसल्यामुळे अडचणीत गेलेल्या आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांना पिक कर्जवाटप करण्यासाठी सुध्दा पैसे नाहीत. त्यामुळे अजित पवार सारखा आभ्यासू नेता जर बॅंकेमध्ये असेल तर बॅंक अडचणीत जाणार नाही, असंही काकडे म्हणाले.
मी कोणत्याही पक्षामध्ये नाही किंवा मी कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी पुणे जिल्हा बँकेसाठी निवडणुक अर्ज भरला नव्हता. मी आत्तापर्यंत पारदर्शक पध्दतीने शेतकऱ्यांसाठी काम करीत आलेलो असुन यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करीत राहणार आहे. त्यामुळे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही व आवश्यकताही नाही.