उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. रामाच्या भूमीत सर्व नियम आणि कायदे उधळून लावले आहेत. हाथरसच्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाही?, असा सवाल करतानाच पंतप्रधानांनी देशातील जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हाथरसच्या घटनेवरून भाजपवर जोरदार टीका केली. हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरेतर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेवर बोलावं. जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. हाथरसच्या घटनेमुळे देशभर सन्नाटा पसरला आहे. लोकांना त्यावर व्यक्त व्हायचं आहे. पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच लोकं मौन आहेत, असंही ते म्हणाले.