कधीकाळी एका पक्षात राहून सोबत काम करणाऱ्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंबद्दल बोलताना त्यांच्यावर जहरी टीका केली. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन ठीक नसून, पक्षाने त्यांना लायकी नसतानाही भरपूर दिलं अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना गौप्यस्फोट केले आहेत. खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली. गिरीश महाजन यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं, की त्यांनी निधीसाठी माझे पाय धरले की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते. दुसऱ्यांनी सांगायचे नसते. माझ्या मागे लांगूलचालन करणारा गिरीश महाजन माझ्या आशीर्वादाने मोठा झाला. गिरीश महाजन यांना कोणी ओळखत नव्हतं, मी त्यांना मोठं केलं असं खडसे म्हणाले.
जामनेर हा मतदार संघ शिवसेनेचा होता. मी स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याकडे आग्रह केल्यानं जामनेर मतदार संघ भाजपाचा झाला. मग त्यांना भाजपकडून जामनेर मतदारसंघात तिकीट मिळालं. "प्रत्येकवेळी आर्थिक मदतीसाठी मला पैसे द्या, मला पैसे द्या, मला मदत मागायचां" असं म्हणत खडसेंनी टीका केली.
जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपचा पराभव झाला म्हणून त्यांचं मन विचलित झालं आहे. मला कमजोर करण्यासाठी भाजपाकडून गिरीश महाजन यांना नेतृत्व देण्यात आलं. आतापर्यंत माझी हाजी-हाजी करत होता. नंतर देवेंद्र फडणवीस यांची हाजी-हाजी करून त्यांना नेतृत्व मिळालं.