20 जून 2022 चा दिवस. विधानपरिषदेचं मतदान सुरू असताना सूर्य मावळतीला झुकत असताना, एकनाथ शिंदे ठाकरे सरकारला अल्पमताकडे झुकवण्याची तयारी करत होते.
विधान परिषदेचं मतदान संपेपर्यंत एकनाथ शिंदे 12 आमदारांना घेऊन सुरतमध्ये पोहोचले होते. तोवर महाराष्ट्राला या अभूतपूर्व बंडानं हादरवलं होतं. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
चर्चेची गुऱ्हाळं सुरू असतानाच, एकनाथ शिंदेंचा गट रातोरात गुवाहाटीला पोहोचला. तिथं पोहोचल्यावर 12 आमदारांची संख्या वाढली होती. पुढच्या दोन ते तीन दिवसात तर ही संख्या 46 वर पोहोचली.
धक्कादायक म्हणजे, एकट्या शिवसेनेतील 39 आमदार एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले होते.
एकनाथ शिंदे या राजकीय घडामोडीला 'उठाव' म्हणत असले, तर हे महाराष्ट्रातील अभूतपूर्व 'बंड' होतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
या बंडानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि पर्यायानं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. आपल्याच पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदेंच्या बंडानं उतरण्यास भाग पाडलं.
मात्र, एकनाथ शिंदेंनी बंड केलं, हा एकच धक्का उद्धव ठाकरेंना बसला नाही, तर पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदे धक्क्यांमागून धक्के देतच राहिले आणि अजूनही देतायेत. यातल्याच निवडक पाच धक्क्यांबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत.
1) शिवसेनेत अभूतपूर्व बंड
एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं बंड आहे.
शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या बंडामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपदही गेलं.
आपल्याच पक्षातील आमदारांनी बंड केल्यानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.
2) गुवाहाटीत बसून प्रतोद बदलला
एकनाथ शिंदेंनी केवळ महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच पाडलं नाही, तर त्यांनी शिवसेनेचं विधिमंडळातील पक्षही ताब्यात घेतला.
एकनाथ शिंदे हे बंडाच्या आधीपासूनच विधिमंडळातील शिवसेनेचे गटनेते होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रतोद नेमण्याचे अधिकार होते. त्यामुळे त्यांनी गुवाहाटीत आमदारांसोबत असातनाच, तिथं रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नेमलं.
या बंडापूर्वी शिवसेनेचे विधिमंडळातील प्रतोद हे सुनील प्रभू होते. मात्र, त्यांना परस्पर काढून भरत गोगावलेंची निवड शिंदेंनी त्यांच्या जागी केली.
3) ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्यांची शिंदेंकडून पुन्हा नियुक्ती
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षातही उभी फूट पडलीय. अनेक ठिकाणचे पदाधिकारी शिंदेंसोबत गेले किंवा शिंदेंना जाहीरपणे समर्थन देऊ लागलेत.
परिणामी उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात जाऊन मॅरेथॉन बैठका घेतल्या. संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरुवात केली.
याचाच एक भाग म्हणून बंडखोर आमदारांचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली.
कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांना हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आलं, तर ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचीही त्यांच्या पदावरून हकालपट्डटी करण्यात आली.
मात्र, एकनाथ शिंदेंनी या हकालपट्टी केलेल्या नेत्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केलं.
यातून एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे पक्षावरही आपलाच ताबा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
4) आमदारांनंतर खासदारांमध्ये फूट
आज, 18 जुलै रोजी आणखी एका बातमीनं उद्धव ठाकरेंना धक्का दिला. ही बातमी म्हणजे शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी शिंदे गटाला समर्थन दिलं.
शिवसेनेचे लोकसभेत एकूण 18 खासदार आहेत. यातील अरविंद सावंत, विनायक राऊत, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि गजानन किर्तीकर हे वगळता इतर खासदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याचे समोर आले.
आधीच शिवसेनेचे 40 आमदार फुटले असताना आता खासदारही फुटतायेत, हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.
संजय राऊतांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही शिवसेना खासदारांचं शिंदे गटाला समर्थन असल्याचं अप्रत्यक्ष मान्यच केलं. त्यामुळे उद्या (19 जुलै) या खासदार फुटीवर दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वाढलीय. कारण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते बंडखोर खासदारांना भेटण्याची शक्यता आहे.
5) शिंदेंकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंना दिला, तो म्हणजे शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत, नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
या नव्या कार्यकारिणीत त्यांनी पक्षप्रमुख पदाला हात लावला नसला, तरी स्वत:ला एकनाथ शिंदेंनी पक्षाचा मुख्य नेता म्हणून घोषित केलं.
यानंतर दीपक केसरकर यांना प्रवक्तेपदी, तर नेते आणि उपनेते पदांचीही घोषणा केली.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना कुणी दिला? हे सर्व बेकायदेशीर आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते धडपडतायेत."
मात्र, एकनाथ शिंदे यांनी थेट पक्ष संघटनेची कार्यकारिणीच बरखास्त करत, नवी कार्यकारिणी जाहीर केल्यानं आता पक्षही ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतायेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे.