Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नाशिक जिल्ह्यातील वाढत्या लम्पी आजाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला "हा" महत्वाचा निर्णय

lumpy virus
, मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (20:14 IST)
जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित करण्यात येत आहे. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या.
 
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.
 
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यातील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण शीघ्र कृती दल स्थापन करून हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत लसीकरणाचे नियोजनाबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.
 
तसेच बाधित क्षेत्रातील म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. आंतर राज्य, आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेचे सहाय्य घेण्यात यावे. तसेच परराज्यातून जे गोवर्गीय पशुधन आपल्या जिल्ह्यात येत असेल त्याच्या तपासणीसाठी आंतर राज्यमार्गावर तपासणी नाका सुरू करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
ज्याठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास त्याबाबत तत्काळ लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयास संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमीतपणे निर्जंतुक फवारणी करावी. त्याचप्रमाणे साथीच्या रोगामुळे मृत पावलेल्या जनावरांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी दिल्या.
 


Edited By - Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune : आठव्या मजल्यावरून पडून बाप-लेकीचा मृत्यू