नाशिक जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढू लागताच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने मार्च महिन्यानंतर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.
यंदा देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, नदी, नाल्यांना मुबलक पाणी होते; परंतु मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात पाच तालुक्यांत 21 टँकरद्वारे सुमारे 47 हजार ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यात मात्र त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
धरणातून शेवटचे आवर्तन सुटेल त्यावर शेतकरी विसंबून आहेत; मात्र पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, येवला या नेहमीच्याच टंचाईग्रस्त तालुक्यातील सुमारे 47 हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.एकट्या येवला तालुक्यात 19 गावे व 7 वाड्यांतील 24 हजार ग्रामस्थांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यातील 29 गावे, 10 वाड्या अशा 39 गावांना 21 टँकरद्वारे 36 फेर्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.
हवामान खात्याने अल निनोमुळे यंदा मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने व पाऊस लांबणीवर पडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मे, जून महिन्यांत देखील टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यामुळे टँकर शंभरी पार करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor