अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा दीपाली चव्हाण होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दीपाली चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यासारखी प्रशासकीय यंत्रणा देशपातळीवर नाही. परंतु, अशा घटना घडणे, अतिशय वेदनादायी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी जे काही करायला लागेल, ते आपण करू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील आहेत. ते दीपाली चव्हाण यांना न्याय देतील, असा विश्वास करत दीपाली चव्हाण यांना वाचवण्यात आपण कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. दीपाली चव्हाण यांचे कुटुंब कोणत्या मनःस्थितीतून जात असेल, याची कल्पना करवत नाही. त्यांच्या आईची काय स्थिती असेल, याचा विचारही करू शकत नाही, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.