छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. शिवाजींची भक्ती होतीच अशी की समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. त्यांचे शिवाजींप्रती प्रेम बघून इतर शिष्यांना शिवाजी राजा असल्यामुळे समर्थांचे त्यांच्यावर प्रेम आहे असे वाटायचे. समर्थ हे जाणत होते आणि म्हणून त्यांनी इतर शिष्यांचा संशय दूर करण्याचे ठरवले.
समर्थ शिष्यांसमवेत रानात गेले. रानात सगळे मार्ग चुकले आणि तेव्हाच समर्थ पोट दुखण्याचे ढोंग करत एका गुहेत जाऊन झोपले. शिष्यांनी बघितले की गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य मात्र हैराण होऊन एकमेकांना बघू लागले. ढोंगी भक्त उपाय करणार तरी कसे. सर्व शांत होते.
तेवढ्यात शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी रानात आले आणि गुहेत वेदनेमुळे समर्थ कण्हत आहे हे कळल्यावर शिवाजी महाराज तेथे आले आणि हात जोडून वेदनेचे कारण आणि त्यावर काय उपाय करू शकतो विचारले. तेव्हा गुरुजींनी इतर भक्तांना सांगितले त्याप्रमाणे शिवाजींना सांगितले की भयंकर पोट दुखत आहे आणि हा रोग असाध्य असल्यामुळे यावर एकच औषध काम करू शकतं. पण ते फार कठिण आहे.
त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, गुरुदेव आपण संकोच न करता औषध सांगा. आपली व्याधी बरी होत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकणार नाही. तेव्हा समर्थ म्हणाले यावर केवळ वाघिणीचे ताजे दूध हेच औषध आहे. आणि ते मिळणे अशक्य आहे.
हे ऐकल्यावर शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करून लगेच निघाले. थोडं दूर गेल्यावर त्यांना दोन वाघाचे छावे दिसले. तेव्हा महाराजांनी विचार केला की निश्चितच यांची आई देखील येथेच कुठे असेल. ते तेथेच उभे राहिले आणि आपल्या पिलांजवळ मनुष्य बघून वाघीण तेथे आली आणि महाराजांवर गुरगुरू लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते परंतु त्यांना लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते.
शिवाजींनी धैर्याने हात जोडून वाघिणीला विनंती केली की मी येथे तुम्हाला मारायला नव्हे तर केवळ दूध घेण्यासाठी आलो आहे कारण त्यांची व्याधी बरी व्हावी म्हणून तुझे दूध पाहिजे. हे दूध मी समर्थांना देऊन येतो आणि हवं तर नंतर तू माझे भक्षण केले तरी काही हरकत नाही.
शिवाजी महाराजांची भक्ती आणि विनम्रता बघून वाघीण शांत झाली आणि महाराजांनी तिचे दूध काढले. तिच्या या वागणुकीमुळे आनंदी होऊन महाराजांनी तिला नमस्कार केला आणि गुहेत पोहचले. महाराजांनी भरलेलं कमंडलू बघत म्हटले की शिवा शेवटी तू वाघिणीचं दूध घेऊन आलास. धन्य आहे तू. तुझ्या सारखा शिष्य असल्यावर गुरु वेदनेत राहूच शकत नाही. शिवाजींना आशीर्वाद देत गुरुजींनी इतर शिष्यांकडे दृष्टी टाकली.
आता शिष्यांना शिवाचा अधिकार कळून आला आणि स्वत:ची चूक देखील. शिष्याची योग्यता असल्यामुळे गुरुंचे त्यावर प्रेम असल्याचे सर्वांना कळून आले. अर्थातच ईर्ष्या करण्यापेक्षा आपल्यातील दुर्गुण दूर केल्याने आपण पात्र ठरू शकता आणि विशेष कृपा आणि प्रेमाचे अधिकारी बनू शकता.