भारताचा अव्वल एकेरी खेळाडू सुमित नागलने येथे जागतिक क्रमवारीत 38व्या क्रमांकावर असलेल्या मॅटिओ अर्नोल्डीचा पराभव करून एटीपी मास्टर्स स्पर्धेत पहिला मुख्य ड्रॉ जिंकला. भारताचा अव्वल एकेरी खेळाडू नागलने पात्रता स्पर्धेद्वारे एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेत प्रवेश केला. त्याने आपल्या इटालियन प्रतिस्पर्ध्याचा 5-7, 6-2, 6-4 असा पराभव केला. आता त्याचा सामना जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या होल्गर रुणशी होणार आहे.
नागलने अव्वल 50 मध्ये स्थान मिळविलेल्या खेळाडूला पराभूत करण्याची ही तिसरी वेळ आहे, तर या मोसमातील या स्तरावरील खेळाडूवर त्याचा हा दुसरा विजय आहे. त्याने मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुलबिकचा पराभव करून मोसमाची सुरुवात केली. यापूर्वी मार्च 2021 मध्ये त्याने अर्जेंटिना ओपनमध्ये चिलीच्या क्रिस्टियन गॅरिनचा पराभव केला होता.
आपल्यापेक्षा वरच्या खेळाडूंना पराभूत करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करणाऱ्या नागलने क्ले कोर्ट स्पर्धेत या विजयासह कारकिर्दीत प्रथमच 80 व्या क्रमांकावर पोहोचण्याची खात्री केली आहे. सध्या तो जगातील 95व्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
सुमितने मार्चमध्ये इंडियन वेल्स स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली होती परंतु पहिल्या फेरीत कॅनडाच्या मिलोस राओनिककडून पराभूत झाला होता. पात्रता फेरीत नागलने जागतिक क्रमवारीत ६३व्या स्थानी असलेल्या फ्लॅव्हियो कोबोलीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.