भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागल याला वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे. नागल प्रथमच या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळत आहे. नागलचा पहिल्या फेरीत सामना सर्बियाच्या मिओमिर केसमानोविकशी होणार आहे.
नागलला पहिल्या फेरीचा अडथळा पार करणे सोपे जाणार नाही कारण तो क्रमवारीत त्याच्यापेक्षा 20 स्थानांनी वरच्या खेळाडूचा सामना करत आहे. त्याने चार वर्षांपूर्वी जर्मनीतील कोलोन येथे नागलचा पराभव केला होता. नागलने पहिल्या फेरीतील अडथळे दूर केले तर त्याचा सामना स्पेनचा पाब्लो कॅरेनो बुस्टा आणि नेदरलँड्सचा टॅलोन ग्रीकस्पोर यांच्यातील विजेत्याशी होऊ शकतो.
नागलने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आणि पहिल्या फेरीत कझाकिस्तानच्या 31व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर जिंकून त्याने क्रमवारीत पहिल्या 100 मध्ये प्रवेश केला. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन यांचा सामना फ्रान्सच्या ॲड्रियन मॅनारिनो आणि जिओव्हानी एम पेरीकार्ड यांच्याशी होईल. बोपण्णा आणि एबडेन गेल्या वर्षी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचले होते.