Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्रायलची स्वस्तातील चंद्रमोहीम फसली; शेवटच्या क्षणी यान चंद्रावर कोसळलं

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (14:41 IST)
इस्रायलचे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले आहे. खासगी निधीतून चंद्रावर पाठवलेलं हे पहिलंच यान होतं. बेरशीट असं या मोहिमेचं नाव होतं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असतानाच या यानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. छायाचित्र घेणं आणि काही प्रयोग करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट होतं.
 
चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची इस्रायलची मनीषा त्यामुळे अपूर्ण राहिली आहे. आतापर्यंत सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन या 3 देशांनाच ही कामगिरी करता आली आहे. या प्रकल्पाचे समन्वयक आणि या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक मोरीस काहन म्हणाले, "आम्हाला यात यश आलं नाही, पण आम्ही प्रयत्न केला. आपण जी मजल मारली ती गर्व वाटण्यासारखी आहे, असं मला वाटतं."
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे तेल अविव येथून ही मोहीम पाहात होते. ते म्हणाले, "पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही, तर पुन्हा नव्याने प्रयत्न करावेत." या यानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास 7 आठवड्यांपूर्वी सुरू झाला होता. मानवरहित हे यान चंद्राच्या अंतिम कक्षेत पोहोचलं होतं. या यानाचा संपर्क तुटल्यानंतर नियंत्रण कक्षात तणावाचं वातावरण होतं. Israel Aerospace Indurstriesच्या अंतराळ विभागाचे व्यवस्थापक ऑपेर डोरोन म्हणाले, "दुर्दैवाने आम्हाला यशस्वी लँडिंग करता आलं नाही."
 
लँडिंगचा पहिला टप्पा नियोजनानुसार झाला होता. हे पाहाण्यासाठी नियंत्रण कक्षाबाहेर लोक जमले होते. पण डोरोन यांनी इंजिन काम करत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी इंजिन रिसेट केलं जात आहे, अशी माहिती दिली. काही सेकंदात इंजिन पूर्वस्थितीत आलं पण लगेचच यानाचा संपर्क तुटला आणि ही मोहीम संपली. या मोहिमेसाठी 100 दशलक्ष डॉलर इतका खर्च आला होता. भविष्यातील कमी खर्चाच्या चंद्रमोहिमांची रूपरेषा या मोहिमेने आखून दिली आहे. बेरशीट हा हिब्रू शब्द असून याचा अर्थ 'सुरुवातीला' असा होतो. खासगीरीत्या चालणारी SpaceIL आणि Israel Aerospace Industries यांनी संयुक्तपणे ही मोहीम आखली होती.
 
चंद्रावर पोहोचण्यासाठी इतका वेळ का लागला?
अंतराळ विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचणं म्हणजे एक उडी घेण्यासारखं आहे. कारण फक्त काही दिवसांत चंद्रावर यान पोहोचू शकतं. पण बेरशीट या मोहिमेला मात्र जास्त वेळ लागला. ही मोहीम 22 फेब्रुवारीला सुरू झाली. फ्लोरिडातील केप कॅव्हेरल इथून या यानाचं प्रक्षेपण झालं. पृथ्वीच्या विस्तारत जाणाऱ्या कक्षांतून प्रवास करत हे यान 4 एप्रिलला चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. चंद्रापर्यंतच सरासरी अंतर 3 लाख 8 हजार किलोमीटर आहे. पण यानाने याच्या 15 पट अधिक प्रवास केला आहे. स्पेस एक्स फालकन 9 रॉकेटमधून या यानाचं प्रक्षेपण झालं. त्यासोबतीने काही उपग्रह आणि प्रयोगिक एअरक्राफ्टचं प्रक्षेपणही याच वेळी करण्यात आलं. खर्च कमी करण्यासाठी हा पर्याय निवडण्यात आला होता.
 
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणं किती कठीण?
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी नियंत्रित लँडिंग करावं लागतं. हे मोठं आव्हान असतं. या यानासाठीचं इंजिन ब्रिटश कंपनी Nammoनं बनवलं होतं. या यानाची उंची 1.5 मीटर इतकी होती. चंद्रावर उतरताना या यानाचा वेग अल्पावधित कमी केला जातो, जेणे करून यानाचं लँडिंग योग्य प्रकारे आणि अलगद होतं. लँडिग होण्यापूर्वी Nammo या कंपनीचे वरिष्ठ प्रोपल्शन इंजिनिअर रॉब वेस्टकॉट म्हणाले, " हे इंजिन अशा प्रकारच्या वापरासाठी आम्ही पहिल्यांदाच वापरत आहोत."
 
ते म्हणाले, "जेव्हा इंजिन सुरू केलं जाईल तेव्हा त्याची उष्णता प्रचंड असेल. त्यानंतर हे इंजिन काही वेळासाठी बंद करावं लागेल आणि पुन्हा सुरू करावं लागेल. हे सर्व अत्यंत काळजीपूर्वक करावं लागणार आहे, जेणे करून हे यान खाली उतरताना वेग नियंत्रणात राहील आणि यान चंद्राच्या पृष्ठभागावर अगलदपणे उतरेल." लँडिंगची प्रक्रिया 20 मिनिटांची होती. यातील सर्व प्रक्रिया स्वयंचलित होती.
 
मोहिमेचं उद्दिष्ट काय होतं?
उच्च रिझोल्युशनचे फोटो घेणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट होतं. लँडिंगपूर्वी काही फोटो घेतले गेले आहेत. त्यानंतर चंद्रावरील मॅग्नेटिक फिल्ड मोजण्याचं काम हे यान करणार होतं. या यानावर नासाचे रिफ्लेक्टरही होते. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील नेमकं अंतर मोजण्यासाठी हे रिफ्लेक्टर बसवण्यात आले होते.
 
मोहिमेचं महत्त्व
चंद्रमोहिमांना 60 वर्षं झाली असताना फक्त 3 देश चंद्रावर यान उतरवू शकले आहेत. सोव्हिएत युनियनने 1966ला, नासाने 1969ला आणि चीनने या वर्षी चंद्रावर यान पाठवलं. इस्रायल चंद्रावर यान पाठवणारा चौथा देश ठरला असता. कमी खर्च आणि कोणत्याही मोठ्या अंतराळ संशोधन संस्थेचा सहभाग नसणं, या मोहिमेचे वैशिष्ट्य होतं. पण चंद्रावर कमी खर्चातील ही पहिलीच मोहीम नाही. याचं मूळ Google Lunar XPrize यात आहे. चंद्रावर 20 दशलक्ष डॉलरमध्ये यान पाठवण्याचं हे आव्हान आहे.
 
ही स्पर्धा गेल्या वर्षी संपली. यासाठीची अंतिम मुदत कुणलाही पूर्ण करता आली नाही. त्यानंतर या फाऊंडेशनने बेरशीट कॉलॅब्रेशनला 1 दशलक्ष डॉलरचं बक्षिस जाहीर केलं. यात सहभागी इतर खासगी संस्थांनी चंद्रावर पोहोचण्यासाठीचे आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments