Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Manoj Mukund Naravane: लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होणार भारताचे नवे लष्करप्रमुख

Manoj Mukund Naravane: लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होणार भारताचे नवे लष्करप्रमुख
, मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (09:40 IST)
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे पुढील लष्करप्रमुख होणार आहेत. मनोज नरवणे हे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत.
 
विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत हे 31 डिसेंबर 2019 रोजी निवृत्त होत आहेत. त्याच दिवशी मनोज नरवणे लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारतील. ते स्वातंत्र्योत्तर भारताचे 28 वे लष्करप्रमुख असतील.
 
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे याचं सुरुवातीचे शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून झालं. तिथेच लष्करी सेवेचे वेध लागले आणि त्यांनी एनडीएमधून लष्कराचं शिक्षण घेतलं. तसेच, ते डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडेमीचेही माजी विद्यार्थी आहेत.
 
इंदौरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयातून नरवणेंनी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एमफील केलं.
 
मनोज नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलात अधिकारी होते.
 
मनोज नरवणे यांची पत्नी शिक्षिका आहे. नरवणे दाम्पत्याला दोन मुली आहेत.
 
लेफ्टनंट जनरल नरवणेंनी लष्करात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या
जून 1980 मध्ये शीख लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधून लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी सैन्यात पाऊल ठेवलं. काश्मीर आणि ईशान्य भारतात कट्टरतावाद्यांविरोधातील मोहिमांचा मोठा अनुभव आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये काश्मीर आणि कट्टरतावाद्यांच्या मुद्द्यांवरून तणावाचं वातावरण असताना लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती झालीय.
 
जम्मू-काश्मीरमध्ये एका राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं नेतृत्त्व नरवणेंनी केलं होतं. शिवाय, मेजर जनरल म्हणून नरवणेंनी आसाम रायफल्सचे ते इंस्पेक्टर जनरलही होते.
 
दिल्लीत नियुक्ती होण्याआधी नरवणे कोलकात्यामध्ये पूर्व विभागाचे प्रमुख होते. भारत-चीनमधील चार हजार किलोमीटर सीमेची भारताकडून देखभाल हे विभाग करतं. शिवाय, नुकत्याच पार पडलेल्या पूर्व सीमेवरील सरावामाची कल्पना नरवणे यांचीच होती.
 
दिल्ली एरिया जनरल ऑफिसर म्हणूनही लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी काम पाहिलंय.
 
ऑपरेशन 'पवन'वेळी श्रीलंकेत पार पडलेल्या इंडियन पीस कीपिंग फोर्समध्येही नरवणे सहभागी होते.
 
तसेच, म्यानमार दूतावासात तीन वर्षे नरवणेंनी काम केलंय.
 
लेफ्टनंट जनरल नरवणेंना मिळालेली पदकं
 
जम्मू-काश्मीरमधील बटालियनचं नेतृत्व केल्याबद्दल - सेना पदक
आसाम रायफल्सचे महानिरीक्ष (उत्तर) म्हणून नागालँडमधील सेवेसाठी - विशिष्ट सेवा पदक
स्ट्राईक कॉर्प्सचं नेतृत्त्व केल्याबद्दल - अतिविशिष्ट पदक
आर्मी ट्रेनिंग कमांडमध्ये GOC-in-C म्हणून सेवा केल्याबद्दल - परम विशिष्ट सेवा पदक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बराक ओबामा: महिला या पुरुषांपेक्षा सरसच, त्यात वादच नाही