Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'शरद पवार महाराष्ट्राचे कोरोना': गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले

Webdunia
शनिवार, 27 जून 2020 (21:05 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रथमच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.
 
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकेचा वर्षाव होत आहे.
 
मात्र यावर प्रथमच बोलताना शरद पवार म्हणाले, "मला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, आणि विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं. अशाप्रकारे ज्याला लोकांनी त्या-त्या वेळेला एकदम बाजूला केलं, त्याची आपण कशाला नोंद घ्यायची?"
 
तर पडळकरांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही साताऱ्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं, "या माणसाची योग्यता नाही. आपण बोलतो काय? आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी आपल्याच तोंडावर उडते, हे त्यांच्याही पक्षाच्या लोकांना उत्तर देता देता कळून चुकलंय.
 
ते पुढे म्हणाले, "या व्यक्तीचा रेकॉर्ड काढून पाहा. पूर्वी ते मोदी साहेबांबद्दलही काय बोलले, ते कळेल. एखाद्याला नको तेवढं महत्त्व देऊन मोठं केल्यावर त्याला आकाश नको तितकं ठेंगणं वाटायला लागतं. तसा परिणाम त्या व्यक्तीवर झाला आहे."
 
काय म्हणाले पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आणि राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे."
 
पुढे ते म्हणतात, "फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावायचं आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे. मला वाटत नाही ते धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. मागील बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावं लागेल."
 
गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता
 
राज्य सरकारची प्रत्येक समूहाबाबत वेगळी भूमिका आहे असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला. पुढे ते म्हणाले, "सगळ्यांना शरद पवारांची भूमिका कळायला लागली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी, कोरोनाची परिस्थिती कमी झाल्यानंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत याची दखल सरकारने घ्यावी."
 
निषेध ते FIR
 
याच वक्तव्याप्रकरणी पडळकरांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आता कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (24 जून) बारामती शहर पोलिसांना गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते. गुरूवारी (25 जून) पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेपोलिसात तक्रार नोंदवली असून पडळकर यांच्याविरोधात कलम 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तोंड सांभाळून बोलावं अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
 
"शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे," असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.
 
"असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करू शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल."
 
पवारांसंदर्भातील वक्तव्य चुकीचं-देवेंद्र फडणवीस
गोपीचंज पडळकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नाही, तर भाजपकडूनही टीका झाली आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबद्दलचं गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
 
"शरद पवार साहेब हे राजकीय विरोधक आहेत, मात्र शत्रू नाहीत. ज्येष्ठ नेत्यांबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केलं असून त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे," असं फडणवीसांनी सांगितलं.
 
"सर्वच पक्षातील लोकांनी बोलताना संयम बाळगायला हवा. ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना भान बाळगले पाहिजे," असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.
 
पडळकरांना मानसोपचारांची गरज-रुपाली चाकणकर
 
बारामतीमध्ये जप्त झालेलं डिपॉझिट, त्यामधून आलेलं नैराश्य या भावनेपोटी आपण बोलत आहात. त्यामुळे तुम्हाला उत्तम मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. जरूर तुम्ही उपचार घ्यावेत असं मला वाटतं, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
 
"शरद पवारांवर टीका करत असताना, तुमचे सर्वोच्च नेते मोदीसाहेब यांचा थोडा आदर्श घ्यावा. कारण ते स्वत: बारामतीमध्ये येऊन साहेबांची स्तुती करतात. साहेबांच्या कार्याचं कौतुक करतात. त्यांचाही आदर्श अनुसरावा. भाजपची असभ्य संस्कृती तुम्ही फार लवकर शिकला आहात. हे दुर्देव आहे," असंही चाकणकर यांनी म्हटलं.
 
त्या पुढे म्हणतात, "मी बारामतीकारांचे आभार मानू इच्छिते. कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी पडळळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवला. ज्या धनगर समाजासमोर बिरोबाची खोटी शपथ घेतली, त्या पडळकरांनी शरद पवारांवर टीका करून, वैचारिक पातळी दाखवून दिली आहे. ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केलं त्या आदरणीय साहेबांवर टीका करून तुम्ही सर्व बहुजनांच्या बातम्या दुखावल्या आहेत. पडळकर तुमचं जितकं वय नाही, तितकी पवार साहेबांची कारकीर्द आहे."
 
सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न-धनयंज मुंडे
 
"राजकारणात नेम-फेम मिळवायचे असले की साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पाहावे. बिरोबा यांना सुबुद्धी देवो," असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
 
ते पुढे म्हणतात, 'मंडल आयोग, नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून पवार साहेबांनी आम्ही बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात याचं वाईट वाटतं'.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments