पॉर्न साहित्य किंवा पॉर्न व्हीडिओ वाईट आहेत असं मानूनही जगभरात सर्वात जास्त प्रमाणात पाहिले जातात. इंटरनेटचा प्रसार आणि त्याची उपलब्धता वाढल्यानंतर पॉर्न पाहाणं सोपं झालं.
पण पॉर्न पाहाण्याबरोबर त्याचे व्यसनात रुपांतर होण्याचे प्रकारही आता दिसू लागले आहेत. या व्यसनाचे आपल्या आयुष्यावर, रोजच्या जगण्यावर काही परिणाम होतात.
ती स्थिती कधी येते? त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम काय होतो? एखाद्या व्यक्तीला पॉर्न पाहाण्याचे व्यसन लागले असल्यास त्यातून बाहेर कसे पडायचे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा येथे प्रयत्न करणार आहोत.
ड्रग्जच्या व्यसनासारखेच परिणाम?
पॉर्नच्या नकारात्मक परिणामांमध्ये त्याचं व्यसन हा सर्वात मोठा परिणाम मानला जातो. केंब्रिज विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासामध्ये पॉर्नचे व्यसन हे ड्रग्जच्या व्यसनाप्रमाणेच आहे असा निष्कर्ष काढण्यात आला, दोन्हीचे परिणाम एकसारखेच होतात असं त्यात दिसून आलं होतं.
या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या पुरुषांमध्ये अर्धी संख्या कंपल्सिव सेक्शुअल बिहेवियर (सीबीएस, सेक्सचं व्यसन) असणारे होते आणि अर्धी संख्या सीबीएस नसणाऱ्यांची होती.
कंपल्सिव सेक्शुअल बिहेवियर ही संज्ञा सेक्सचं व्यसन असणाऱ्या लोकांसाठी वापरली जाते. यामध्ये सतत सेक्सचे विचार डोक्यात येणे, व्यक्तीच्या वागण्यामुळे तिच्याच ताणात वाढ होणे, कामावर वाईट परिणाम होणे, नातेसंबंध आणि आय़ुष्यातील इतर संबंधांवर परिणाम होणे असे प्रकार दिसून येतात.
या अभ्यासामध्ये सीएसबी असणाऱ्या पुरुषांच्ये मेंदूमधल्या तीन जागा सक्रीय किंवा उत्तेजित झालेल्या दिसल्या, ड्रग्ज घेणाऱ्या लोकांमध्येही नेमक्या याच जागा उत्तेजित झालेल्या दिसतात.
सेक्सचं व्यसन असणाऱ्या लोकांनी 'सेक्शुअली एक्सप्लिसिट' व्हीडिओला पसंती दाखवली मात्र त्यांना ते आवडलेच असं नाही. याकडेच संशोधकांचं लक्ष गेलं. इच्छा आणि आवड यातला संबंध संपणं हे ड्रग्जच्या व्यसनाकडे बोट दाखवत होतं.
व्यक्तीला व्यसनामुळे एखादी गोष्ट हवीहवीशी वाटते पण ती तिचा आनंद घेऊ शकत नाही. असं निरीक्षण त्यात दिसत होतं. सीबीएस असणाऱ्या पुरुषांची स्थिती ड्रग्ज व्यसनींप्रमाणे असली तरी पॉर्न व्यक्तीला व्यसन जडवू शकतं असं त्यातून सिद्ध होईलच असं नाही असा निष्कर्ष अभ्यासकांनी त्यातून काढला.
पॉर्नचा संबंध लैंगिक व्यभिचाराशीही जोडला जातो. भरपूर पॉर्न पाहाणाऱ्या लोकांमध्ये कॅज्युअल सेक्सचं प्रमाण जास्त असल्याचा एक अभ्यास सांगतो.
मात्र हे प्रमाण नाखुश लोकांमध्येच आढळलं. खूप पॉर्न पाहाणाऱ्या लोकांमध्ये अनेक जोडीदारांबरोबर सेक्स करण्याचा कल दिसला. मात्र ते पॉर्नमुळे झालं की त्यांच्यात आधीपासूनच असणाऱ्या गोष्टींमुळे ते स्पष्ट झालेलं नाही.
पॉर्न म्हणजे काय?
पॉर्न हा शब्द पॉर्नी (प्रॉस्टिट्यूट) पासून आला आहे. एकेकाळी प्रॉस्टिट्यूटवरती लिहिल्या जाणाऱ्या साहित्याला तो शब्द वापरला जाई. त्यानंतर ते मूर्ती, छापिल साहित्य, व्हीडिओ अशा मार्गांनी पॉर्न येऊ लागलं, अशी माहिती 'हॅलो सेक्शुअलिटी' पुस्तकाचे लेखक डॉ. प्रसन्न गद्रे देतात.
पॉर्नचे परिणाम
आपल्याकडे अनेक गोष्टी तारक आहेत की मारक, त्या फायदेशीर आहेत की वाईट याचा विचार केला जातो. तसाच प्रश्न पॉर्नच्या बाबतीत विचारला जातो.
याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. प्रसन्न म्हणाले, "हा प्रश्न सर्वच वस्तू, गोष्टींच्या बाबतीत लागू होतो. एखादी गोष्ट कशी वापरली जाते यावर ती चांगली की वाईट ठरते. उदाहरणार्थ-एखादा चाकू वाईट विचार मनात ठेवून एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी वापरला जातो आणि तशाच चाकूचा रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठीही वापर केला जाऊ शकतो."
आपल्याकडे सेक्सकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जात असल्यामुळे पॉर्नच्याही सर्व नकारात्मक गोष्टी फुगवून सांगितल्या जातात असं डॉ. गद्रे सांगतात. "लैंगिक ज्ञानाबद्दल अनास्था, मोकळेपणाचा अभाव यामुळे लोकांना सांगोवांगीच्या गोष्टी, मित्रांबरोबर गप्पा, पॉर्न अशा गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं. अनेक लोकांचं सेक्सचं शिक्षण पॉर्नमधून होतं. यात सुशिक्षित, शहरी लोकांचाही समावेश आहे."
डॉ. गद्रे सांगतात, "लैंगिक भावनांचं शमन करण्यासाठी वेश्यागमन, व्यभिचार, अनेक जोडीदारांबरोबर सेक्स करण्यामुळे त्वचेचे काही रोग, गुप्तरोग, एड्स होण्याची शक्यता जास्त असते. मात्र पॉर्नमध्ये हा धोका नसतो.
पॉर्नमध्ये आभासी सेक्स जोडीदार उपलब्ध असतो, लैंगिक भावनांचं शमन करण्यासाठी पॉर्न सहज उपलब्ध असतं. तसेच यात गरोदरपण, गर्भपात याचाही धोका नसतो. पॉर्नमुळे वेश्यागमन कमी होतं असं नाही पण ते प्रमाण कमी होऊ शकते. "
व्यसन कोणत्या स्थितीला म्हणावं?
पॉर्न पाहाणे आणि त्याचं व्यसन लागणे यातला फरक कसा ओळखायचा हा प्रश्न मनामध्ये येतोच. याबद्दल बीबीसी मराठीने 'अथातो कामजिज्ञासा' पुस्तकाचे लेखक आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांना विचारलं.
ते म्हणाले, "कोणत्याही सवयीमुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात, कामात अडथळा येत असेल, एकाग्रतेवर परिणाम होत असेल, तुमची कर्तव्यं पार पाडण्यात अडथळा येत असेल, शरीर-तब्येतीकडे दुर्लक्ष होऊन त्या गोष्टीकडे अधीन झाल्यासारखं वाटत असेल तर ते व्यसन म्हणता येईल."
ही कसोटी फक्त पॉर्न नाही तर सर्वच गोष्टींच्या बाबतीत लागू होते असं ते सांगतात.
डॉ. राजन भोसले म्हणाले, "पॉर्नसकट सर्व व्यसनांच्या बाबतीत बहुतांश लोक सुरुवातीला नाकबूल स्थितीत (डिनायल फेज) असतात. म्हणजे मी यातून कधीही बाहेर पडू शकतो, वेळ आहे म्हणून हे मी पाहातोय, मला काही याचं व्यसन नाही अशा स्थितीत असतात. अशा लोकांना मदत करणं कठीण असतं. हे लोक मोठा फटका बसल्याशिवाय व्यसनावर विचार करत नाहीत. अनेक लोक डॉक्टरकडे गेल्यावर उपचार पूर्ण घेत नाहीत. त्यांच्यामध्ये व्यसनाची लक्षणं पुन्हा दिसू शकतात."
पॉर्नच्या अतिरेकामुळे माणसावर होणाऱ्या वाईट परिणामाबद्दल बोलताना डॉ. गद्रे म्हणाले, "आपण पाहात असलेल्या सर्व गोष्टींचा माणसं, प्राणीमात्रांवर होत असतो. आभासी-खोट्या गोष्टी पाहिल्यामुळे मनात मिथकं तयार होतात. त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात.
पॉर्नमध्ये दाखवलेल्या गोष्टींची अपेक्षा लोक करायला लागतात. पॉर्नमध्ये दाखवलेल्या गोष्टी सत्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो त्यामुळे समस्या तयार होतात."
'आपल्याला पॉर्न पाहाण्य़ाची अतिरेकी सवय लागली आहे, त्याचा आपल्यालाच त्रास होतोय हे व्यक्तीला समजण्याची गरज आहे. त्याला व्यसन म्हणायचं की नाही हे डॉक्टर ठरवू शकतील,' असं गद्रे सांगतात.
क्रेविंग- पॉर्न पाहाण्याची इच्छा निर्माण होणे, कंपल्शन- काहीही करुन ते पाहाण्याची उर्मी, कंट्रोल- ही सवय नियंत्रणात येत नसल्यास, केअरलेसनेस- स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणे, कमिटमेंटलेस-माणूस म्हणून, कुटुंबातला सदस्य, नागरिक म्हणून आपली बांधिलकी विसरणे, कंटिन्युअसनेस- ही सवय सतत वाढत राहाणे.
या निकषांचा विचार करुन व्यक्तीची सवय कुठल्या पातळीत बसते याचा विचार डॉक्टर करतात. त्यावरुन व्यक्तीला पॉर्नच्या सवयीचं रुपांतर व्यसनात झालं आहे का हे तपासलं जातं, असं डॉ. गद्रे यांनी सांगितलं.
व्यसनातून बाहेर येण्यासाठी...
पॉर्नच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी व्यसनाचं कारण शोधण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञ सांगतात. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा जोडीदार, घरातले इतर लोक, जवळचे मित्र, डॉक्टरांची टीम अशा सर्वांची मदत लागते. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यावर व्यसनातून बाहेर पडता येतं, असं डॉ. राजन भोसले यांनी सांगितलं.
पॉर्न पाहाणारे सेक्सचा आनंद घेऊ शकतात का?
पॉर्न पाहण्याचा व्यक्तीच्या पुढील आयुष्यावर, वागण्यावर परिणाम दिसू शकतो, असं अनुमान नेब्रास्का विद्यापीठातील संशोधकांनी 2017 साली केलेल्या एका सर्वेक्षणातून काढलं होतं.
पुरुषांनी जितक्या कमी वयात पॉर्न फिल्म्स पाहिल्या तितक्या जास्त प्रमाणात ते महिलांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात असं या सर्वेक्षणात आढळलं होतं.
20 वर्षाच्या 330 मुलांचं सर्वेक्षण यासाठी करण्यात आलं होतं. वयाच्या सरासरी 13 व्या वर्षी मुलं पॉर्न पाहातात असं त्यातून दिसलं होतं. त्यातील सहभागी मुलांना 46 प्रश्न विचारण्यात आले होते. जास्त वय असलेल्या पॉर्न पाहाणाऱ्या लोकांमध्ये भरपूर सेक्स करण्याची आणि भरपूर जोडीदार बदलण्याची इच्छा दिसून आली.
या सर्वेक्षणावर मत व्यक्त करताना अभ्यासक क्रिस्टिना रिचर्डसन म्हणाल्या होत्या, " जे लोक कमी वयात पॉर्न पाहातात ते पुढच्या काळात खऱ्या आयुष्यात सेक्सचा तितक्या प्रमाणात आनंद घेऊ शकत नाही. अशा लोकांच्या मनात महिलांप्रती सेक्ससंदर्भात काही धारणा तयार होतात. परंतु सेक्सचा अनुभव पॉर्नसारखा असत नाही"