कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्त्वाच्या १३ ते १४ हॉस्पिटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७ जुलै पर्यंत ह्या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ.भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.