Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्री भक्तविजय अध्याय ४५

श्री भक्तविजय अध्याय ४५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेवकीनंदनाय नमः ॥    ॥
ऐका श्रोते हो कथा रसिक ऐकतां निवारी भवरोगदुःख ॥ अंतरी ठसावे पूर्ण विवेक ॥ निजशांतिसुख ये हातां ॥१॥
जांहीं न करितां योगसाधन ॥ न घडतांचि तीर्थाटन ॥ भक्तकथा ऐकतां मन लावून ॥ वैकुंठभुवन पावती ॥२॥
जरी बहुत नसली शास्त्रव्युत्पत्ति ॥ अंगासी न येतां वैराग्यस्थिति ॥ परी हरिकीर्तनीं लावितां प्रीति ॥ ते पावन होती क्षणमात्रें ॥३॥
जयासी न घडे व्रतनेम ॥ रसनाविषय नव्हेचि शम ॥ तिहीं वाचांसीं स्मरतां रामनाम ॥ स्वयें पुरुषोत्तम ते होती ॥४॥
अंगीं जयांसी कृपणता ॥ आणि कुटुंबीं वाढली विशेष ममता ॥ तिहीं श्रवण करितांचि भक्तकथा ॥ अनुताप चित्ता ठसावे ॥५॥
जैसा लोहदंड होतां मळकट ॥ परी परीस लागतां तत्काळ पालट ॥ तेवीं भक्तकथेची लगतां चट ॥ विवेकभेट अज्ञाना ॥६॥
जरी पूर्वपुण्याची असेल कोडी ॥ तरीच ये कथेची लागेल गोडी ॥ इतर प्राक्तनहीन जीं बापुडीं ॥ तीं विकल्पें नाडलीं सर्वस्वें ॥७॥
म्हणोनि तुम्ही भाविक प्रेमळ ॥ मज दिसतां दैवाआगळ ॥ जे सात्विक कथेचे गराळ ॥ सेवितां सकळ निजप्रेमें ॥८॥
मागील अध्यायीं कथा निगुतीं ॥ परमपावन परिसिली श्रोतीं ॥ जे भानुदासें पांडुरंगमूर्ती ॥ पंढरीसी मागुती आणिली ॥९॥
त्या भानुदासाचा पुत्र सद्गुणी ॥ त्याचें नाम ठेविलें चक्रपाणी ॥ तो परम भाविक वैष्णव ज्ञानी ॥ श्रीहरिभजनीं निमग्न ॥१०॥
त्याचा पुत्र सूर्यनारायण ॥ जो ज्ञानप्रकाशें देदीप्यमान ॥ त्याची कांता सुलक्षण ॥ नाम रुक्मीण तियेचें ॥११॥
तिचें उदरीं जन्मला सुत ॥ नाम त्याचें एकनाथ ॥ जो जगद्गुरु अवतला साक्षात ॥ परिसा चरित्र तयाचें ॥१२॥
तों दिवसेंदिवस जाहला थोर ॥ व्रतबंध केला सत्वर ॥ मायबापें तयावर ॥ कृपा अपार करिताती ॥१३॥
तेथें जनार्दनपंत ज्ञानराशी ॥ दत्तात्रेयदर्शन होत त्यासी ॥ एकनाथ उठोनि एके दिवसीं ॥ गेला दर्शनासी तयाच्या ॥१४॥
आंगडें टाकूनि मस्तकावरी ॥ सद्भावें त्यास नमस्कारी ॥ जनार्दन देखोनि ते अवसरीं ॥ विस्मित अंतरीं होतसे ॥१५॥
म्हणे तूं कवणाचा सांग त्वरित ॥ कशास्तव आलासी येथ ॥ जनार्दनें संबोखोनि तयाप्रत ॥ वृत्तां पुसत तेधवां ॥१६॥
टाकूनि मातापितयांसी ॥ रुसोनि आलासी आम्हांपासीं ॥ हें यथार्थ सांगावें मजसी ॥ संकोच मानसीं न धरितां ॥१७॥
मग जोडूनियां दोनी कर ॥ एकनाथ बोले मधुरोत्तर ॥ म्हणे मी ऋग्वेदी ब्राह्मणकुमर ॥ दर्शना साचार पातलों ॥१८॥
मायबापांवरी न रुसतां ॥ उगाच अनुताप वाटला चित्ता ॥ कीं देहीं जडली प्रपंचममता ॥ कामक्रोधें चित्ता गांजिलें ॥१९॥
लोभ माया दंभ अहंकार ॥ हे देहीं दिसती अनिवार ॥ मग स्वामींच्या दर्शनासी सत्वर ॥ आलों साचार निजप्रेमें ॥२०॥
आतां हेचि इच्छा असे मानसीं ॥ कीं निरंतर राहावें तुम्हांपासीं ॥ सेवा करावी अहर्निशीं ॥ निजभावेसीं आवडीं ॥२१॥
मी पतित शरण आलों पाहें ॥ अंगीकार करीं सद्गुरुमाये ॥ ऐसें बोलोनि लवलाहें ॥ धरिले पाये सद्भावें ॥२२॥
एकनाथाचें ऐकूनियां वचन ॥ आश्चर्य करिती जनार्दन ॥ म्हणे वय तों दिसतें लहान ॥ परी विशाल ज्ञान अनुपम ॥२३॥
मग जनार्दनें अभय देऊनि त्यासी ॥ म्हणे सुखें असावें आम्हांपासीं ॥ हें वचन ऐकूनि मानसीं ॥ उल्हास चित्तासी वाटला ॥२४॥
जैसा द्वैपायन पडतां संशयवनीं ॥ तयासी भेटले नारदमुनी ॥ तेवीं जनार्दनाच्या अभयवचनीं ॥ एकनाथ मनीं संतोषला ॥२५॥
कीं हंसरूप भेटतां नारायण ॥ विरिचीसी वाटलें समाधान ॥ तेवीं जनार्दनाचे अभयेंकरून ॥ एकनाथ मनीं संतोषला ॥२६॥
स्वामिसेवेसी निरंतर ॥ अहोरात्र असे तत्पर ॥ कोणेविषयीं न पडेचि अंतर ॥ भावार्थ थोर धरियेला ॥२७॥
रात्रीं निजतां जनार्दन ॥ स्वकरें चुरीत बैसे चरण ॥ निद्रा लागतां त्याजकारण ॥ परी न उठणें सर्वथा ॥२८॥
विडा करूनि निजहस्तें ॥ सर्व साहित्य मिळवूनि त्यांत ॥ जनार्दनासी होऊनि विनीत ॥ घाली मुखांत निजप्रेमें ॥२९॥
मुख प्रक्षाळावयासी तस्त ॥ निजकरें पुढें आणोनि ठेवीत ॥ स्नान घालूनियां आपुले हस्तें ॥ साहित्य देत पूजेचें ॥३०॥
गंधाक्षता सुमन चंदन ॥ धूपदीपादि उपचार जाण ॥ जेव्हां जें मागती जनार्दन ॥ तें सत्वर आणून देतसे ॥३१॥
जेवितां शेष उच्छिष्ट राहात ॥ तें निजप्रीतीं भक्षी एकनाथ ॥ ऐसी सेवा दिवस बहुत ॥ असे करीत निजप्रेमें ॥३२॥
जनार्दन रात्रीं कफपित्त ॥ थुंकोनि टाकिती तस्ताआंत ॥ तें एकांतीं नेऊनि एकनाथ ॥ प्राशन करीत आवडीं ॥३३॥
बहिर्भूमीचें जें स्थळ ॥ तें स्वहस्तें करी अति निर्मळ ॥ ऐसा गुरुभक्तीसी सर्वकाल ॥ एकनाथ केवळ विनटला ॥३४॥
हें जनार्दनें दृष्टीं देखतां ॥ मग आश्चर्य करी निजचित्ता ॥ म्हणे मनुष्य म्हणूं न ये एकनाथा ॥ सकळ गुरुभक्तां वरिष्ठ कीं ॥३५॥
एकांत पाहोनि एके दिवसीं ॥ जनार्दन कृपेनें पुसती त्यासी ॥ तूं सेवा करितोसी आम्हांपासीं ॥ मायबापांसी न कळतां ॥३६॥
तुम्ही तंव विरक्त दिसतां जाण ॥ घरीं पाहिजे वस्त्र अन्न ॥ वडील वृद्ध दोघें जण ॥ चिंता दारुण करितील ॥३७॥
ऐसें जाणूनि जनार्दन ॥ घरीं पाठवीत वस्त्र अन्न ॥ वडिलांसी कळतां वर्तमान ॥ समाधान वाटलें ॥३८॥
जनार्दन विचारी निजअंतरीं ॥ म्हणे यासी सांगावी कांहीं चाकरी ॥ मग एकनाथासी आज्ञा करी ॥ हिशेब दप्तरीं राखावा ॥३९॥
तूं येथें असलासी जरी प्रवीण ॥ तरी कळों येईल अवघेंचि ज्ञान ॥ मग अवश्य म्हणोनि केलें नमन ॥ म्हणे आज्ञा प्रमाण स्वामींची ॥४०॥
परी सेवेसी न पडतां अंतर ॥ हिशेब राबावा निरंतर ॥ जनार्दन म्हणती परम चतुर ॥ कळला विचार मजलागीं ॥४१॥
तरी कांहीं निमित्त करूनि जाण ॥ स्वरूपीं लावावें याचें मन ॥ एकनाथासी जवळी बोलावून ॥ म्हणे हिशेब दाखवणें आम्हांसी ॥४२॥
पाहूनि खरडा खतावणी ॥ हिशेब दाखवीं आम्हांलागूनी ॥ अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ पुढती चरणीं लागला ॥४३॥
सेवेचा सारूनि नित्यनेम जाण ॥ रात्रीं दीपकासी घातलें भरण ॥ त्यांत एक अडका राहिला चुकोन ॥ तोचि धुंडोन पाहातसे ॥४४॥
परी कोठेंचि न सांपडे त्वरित ॥ ताळा न प्डेचि हिशेबांत ॥ मग एकाग्र करून चित्त ॥ हिशेब पाहात बैसला ॥४५॥
क्षणभ्स्रीही न करी शयन ॥ न मानी निजदेहाचा शीण ॥ तृषा लागली अति दारुण ॥ परी उदकपान करीना ॥४६॥
म्हणे उपकार करूनि उदक प्राशितां ॥ तरी निद्रा आळस येईल तत्वतां ॥ मग काय सांगावें गुरुनाथा ॥ विवेक चित्ता करीतसे ॥४७॥
जनार्दन जागृत होऊनि त्वरित ॥ सभोंवतें विलोकूनि जंव पाहात ॥ तों एकनाथ न दिसे तेथ ॥ म्हणोनि विस्मित जाहले ॥४८॥
अंतर्गृहीं धुंडितां देखा ॥ तों हिशेब पाहात  बैसला एका ॥ भरण घालोनि दीपका ॥ धुंडित अडका निश्चलत्वें ॥४९॥
तों अकस्मात ताळा पडतां ॥ हर्ष वाटला एकनाथा ॥ मग आपुल्याच हातें टाळी पिटितां ॥ दुसरा नसतां सन्निध ॥५०॥
मागें उभे राहून तेथ ॥ जनार्दन पाहती कौतुकांत ॥ मग सन्मुख येऊनि त्वरित ॥ स्वमुखें पुसत तयासी ॥५१॥
सद्गुरु म्हणती एकनाथा ॥ काय आश्चर्य वाटलें चित्ता ॥ म्हणोनि हर्ष मानूनि आतां ॥ हांसलासी ये क्षणीं ॥५२॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ वरतें पाहे विलोकून ॥ मग सत्वर उभा राहून ॥ केलें नमन सद्भावें ॥५३॥
म्हणे सर्व हिशेब शोधून पाहतां ॥ त्यांत एक अडका चुकला होता ॥ त्याचा अकस्मात ताळा पडतां ॥ उल्हास चित्ता वाटला ॥५४॥
म्हणोनि संतोष पावून मन ॥ हांसें आलें मजकारण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ जनार्दन विस्मित ॥५५॥  
मग एकनाथासी सद्गुरु बोलत ॥ तुझें अडाक्याकडे लागलें चित्त ॥ तैसें श्रीकृष्णचरणीं होतां रत ॥ तरी पावशील निजहित आपुलें ॥५६॥
ऐसीं अक्षरें पडातां कानीं ॥ अनुताप जाहला तये क्षणीं ॥ म्हणे हेचि इच्छा होती मनीं ॥ जे आज्ञा स्वामींनीं मज द्यावी ॥५७॥
धन्य दिवस सुदिन आजिचा ॥ अनुग्रह जाहला तये क्षणीं ॥ म्हणे हेचि इच्छा होती मनीं ॥ जे प्रपंचाचा पुसिला ॥५८॥
मग लेखणी घेऊनि तये क्षणीं ॥ एकनाथें ठेविली सद्गुरुचरणीं ॥ सांगितली जमाखर्चघडणी ॥ ते ऐकावी सज्जनीं निजप्रीतीं ॥५९॥
नरदेह मुद्दल सालमजकुर ॥ गुदस्तां रुजू पूर्वसंस्कार ॥ प्रेमपत्र हृदयीं अक्षर ॥ स्वधर्म थोर खर्च केला ॥६०॥
फळत्याग करितांचि सकळ ॥ रुजू पावेल स्वामींजवळ ॥ ब्रह्मार्पणीं तये वेळ ॥ अर्पिलें न कळे सर्वथा ॥६१॥
विचार सुरस हा निजनेमाचा ॥ सावधानपणीं लिहितां साचा ॥ वरी मनसुर सद्गुरुकृपेचा ॥ हिशेब सकळाचा पुसिला ॥६२॥
एवं नरदेहजमा झाडियासी आणूनी ॥ अज्ञानबाकी झाडा करूनी ॥ मी विनटलों तुमचे चरणीं ॥ व्यापार सांडोनि निजछंदें ॥६३॥
त्रैलोक्याचे स्वामी आपण ॥ व्यापार जाहला तुम्हांपासून ॥ ते वाचेसी आवडे कृष्णनाम ॥ कृपेंकरून आपुल्या ॥६४॥
सोहं दिधलें खुर्द खत ॥ तें मस्तकीं वंदिलें म्यां त्वरित ॥ प्रेमाचीं वस्त्रें अपरिमित ॥ पावलों निश्चित ये काळीं ॥६५॥
निजमुक्तीचा लाधलों विडा ॥ तेणें वारिली भवरोगपीडा ॥ कैवल्यपुरासी जाऊनि रोकडा ॥ चैतन्यहुडा बैसलों ॥६६॥
स्वानुभवाची तहसील निकी ॥ रसद स्वामींसी दिधली शेखीं ॥ सत्संग सारूनि वसूलबाकी ॥ हुजत नेटकी भक्ताची ॥६७॥
पूर्वसुकृत होतें कांहीं ॥ मग रामनामव्यापारीं लागलों पाहीं ॥ ऐसें म्हणूनि तये समयीं ॥ घातले पायीं दंडवत ॥६८॥
हें वचन ऐकितांचि श्रवणीं ॥ जनार्दन विस्मित जाहले मनीं ॥ म्हणे यासी उपदेश द्यावयालागूनी ॥ अधिकार दिसोनि येतसे ॥६९॥
मग उठवोनि एकनाथाप्रती ॥ जनर्दन कृपेनें अलिंगिती ॥ रामकृष्णमंत्र तारक निश्चितीं ॥ सद्गुरु सांगती तेधवां ॥७०॥
तेथेंचि विश्वास धरूनि दृढ ॥ परमार्थयोग साधिला गूढ ॥ कीर्तनीं हरिगुणपवाडे ॥ गातसे कोडें निजप्रीतीं ॥७१॥
इतुकी कृपा जाहलियावरी ॥ परी सद्गुरुसेवेंत अंतर न करी ॥ दिवसेंदिवस अधिकोत्तरी ॥ सद्भाव साचारीं बैसला ॥७२॥
हा निश्चय देखोनि जनार्दन ॥ म्हणे यासी मनुष्य म्हणेल कोण ॥ विश्वोद्धार करावयालागून ॥ अवतार पूर्ण विष्णूचा ॥७३॥
यावरी करूनि कृपादृष्टी ॥ श्रीदत्तात्रेयाची करवावी भेटी ॥ ऐसें विचारूनियां पोटीं ॥ जीवींची गोष्टी सांगतसे ॥७४॥
एकनाथासी म्हणे जनार्दन ॥ तुज श्रीदत्तात्रेयाची भेट करीन ॥ परी निर्भय असूनि त्वां मनें ॥ चित्तीं न भिणें सर्वथा ॥७५॥
ते आपुलीं स्वरूपें कडोविकडी ॥ पालट करिती घडीघडी ॥ अज्ञानी जन निंदिती रोकडी ॥ काया चोखडी तेचि धरिती ॥७६॥
तरी मी जयासी बोलेन गोष्टी ॥ तूं त्याचे चरणीं घाली मिठीं ॥ आलिंगन देऊनि उठाउठीं ॥ सद्गुरूसी पोटीं धरावें ॥७७॥
प्रसाद दिधला तुजकारण ॥ तरी तेथेंचि भक्षीं निजप्रीतीनें ॥ ऐसी जनार्दनें देतां शिकवण ॥ एकनाथ चरण धरितसे ॥७८॥
म्हणे हेचि इच्छा बहुत दिनीं ॥ वाटतसे माझिया मनीं ॥ परी स्वामींची मर्यादा उल्लंघोनी ॥ सर्वथा माझेनि न बोलवे ॥७९॥
तें आजि आपुलें स्वमुखेंकरून ॥ स्वामींनीं मज दिधलें अभयवचन ॥ तो आजि मनोरथ पूर्ण करून ॥ करवावें दर्शन दत्ताचें ॥८०॥
ऐसा पूर्ण जाणूनि हेत ॥ एकनाथासी नेलें अरण्यांत ॥ तंव तेथें अनसूयासुत अकस्मात ॥ आले त्वरित भेटावया ॥८१॥
जनार्दन म्हणे एकनाथा ॥ आमुचे स्वामी ओळखें आतां ॥ तों अविंध बैसोनि अश्वावरुता ॥ आला अवचिता त्या ठाया ॥८२॥
ऐसें रूप देखतां दृष्टीं ॥ एकनाथ भयभीत जाहले पोटीं ॥ म्हणे प्रत्यक्ष यवन दिसतो दृष्टीं ॥ असत्य गोष्टीं मज वाटे ॥८३॥
विशाल भाल आरक्त नयन ॥ हातीं शस्त्रें अश्ववाहन ॥ संनिध येऊनि उतरला जाण ॥ मग केलें नमन जनार्दनें ॥८४॥
यवनभाषेनें अनसूयासुत ॥ जनार्दनासीं बैसले बोलत ॥ हें दृष्टीसी देखोनि एकनाथ ॥ आश्चर्य करीत मानसीं ॥ ८५॥
सद्गुरु म्हणती जनार्दना ॥ क्षुधा लागली करूं भोजना ॥ तेथें पक्वान्नें निर्मूनि नाना ॥ आश्चर्यरचना दाखविली ॥८६॥
रत्नजडित कनकताट ॥ त्यांत षड्रस वाढिले गोमट ॥ जनार्दन बैसोनि निकट ॥ जेवीत स्पष्ट सांगातें ॥८७॥
सद्गुरु म्हणती जनार्दना ॥ पैल तो मूल दिसतो नयना ॥ त्यासी सत्वर बोलवावें भोजना ॥ तुमच्या मना येईल तरी ॥८८॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ विकल्प वाटला त्याजकारण ॥ म्हणे यवनचें कैसें भक्षावें अन्न ॥ गेले पळूनि दूर तेव्हां ॥८९॥
दत्तात्रेय तत्काळ अदृश्य होतां ॥ आश्चर्य वाटलें एकनाथा ॥ सद्गुरुचरणीं ठेवूनि माथा ॥ झाला पुसता निजप्रेमें ॥९०॥
म्हणे कोण आला होता यवन ॥ तुम्ही भेटलेती त्यालागून ॥ ते म्हणती तुज नेणवेचि खूण ॥ तो अत्रिनंदन होता कीं ॥९१॥
साधन करितां नानासायास ॥ परी त्याचें दर्शन नव्हेचि कोणास ॥ ते तुज भेटतां अनायासें ॥ परी विकल्प चित्तास आला कीं ॥९२॥
वाटेसी जातां अभाग्य नरू ॥ तों अवचित भेटला कल्पतरू ॥ त्यासी डावलोनि केला अव्हेरू ॥ तैसाचि विचारू त्वां केला ॥९३॥
नातरी अमूल्य मुक्ताफळ ॥ हातावरी पडिलें तत्काळ ॥ तंव दैव नसतां झांकिले डोळे ॥ तैसेंच घडलें तुजलागीं ॥९४॥
अमृतसिंधू पडल्या दृष्टीं ॥ काळासही मारवेल काठी ॥ परी अनसूयासुत उठाउठीं ॥ प्राकृतदृष्टी पडेना ॥९५॥
वज्रासनयोग अवघडे ॥ तोही साधवेल वाडेंकोडें ॥ परी दतात्रेयाचें दर्शन न घडे ॥ तें तुज जोडे अनायासें ॥९६॥
जीवमात्राचें मनोगत ॥ न सांगतांचि कळेल त्वरित ॥ परी दृष्टी पडावा अत्रिसुत ॥ हें अघटित एकनाथा ॥९७॥
निजबळें पाहूनि आपण ॥ सप्तसागरांचें घडेल स्नान ॥ परी सद्गुरूचें दर्शन दैवेंकरून लाधलें ॥९८॥
पुढील भविष्य नेणेंचि कोणी ॥ तेही एक वेळ कळेल मनीं ॥ परी दत्तात्रेय साक्षात येऊनी ॥ कोणालागूनि न भेटती ॥९९॥
ते तुज अनायासें भेटले असतां ॥ वायांचि विकल्प धरिला चित्ता ॥ बरें पुढें दर्शन दिधल्या अवचितां ॥ तरी सावधानता असावी ॥१००॥
यावरी एकनाथ उत्तर देत ॥ मी तुमचा म्हणवितों मुद्रांकित ॥ आणिके ठायीं लावितां चित्त ॥ विकल्प धरीत निजमनीं ॥१॥
बालक पित्याचें जाण अंतरीं ॥ पितामह सहजचि लोभ करी ॥ तेवीं तुमचे चरण धरितां शिरीं ॥ श्रीदत्त मजवरी तुष्टेल ॥२॥
कीं पुष्पें धरितां देंठास ॥ त्यासी सहजचि पावेल मूळींचा रस ॥ तेवीं तुमचा लागतां निदिध्यास ॥ दत्त अनायासें भेटती ॥३॥
ऐसें सद्गुरूसी बोलोनि वचन ॥ उभयतां घरासी आले त्वरेन ॥ एके दिवसीं जाण ॥ आम्हांकारण बोलती ॥४॥
आजि वनांत जाऊनि तुजकारण ॥ श्रीदत्तात्रेयाचें करवितों दर्शन ॥ परी कोणत्या रूपें येतील जाण ॥ आम्हांकारण कळेना ॥५॥
ऐसें बोलोनि तयाप्रती ॥ अरण्यांत गेले सत्वरगती ॥ तंव मलंगरूपें अवचितीं ॥ दत्तात्रेयमूर्ति येतसे ॥६॥
मायारूप तेचि कामिनी ॥ कामधेनु सवें दिसली शुनी ॥ ऐसें रूप दृष्टीसी देखोनी ॥ जनार्दन मनीं आनंदले ॥७॥
मग पुढें होऊनि सत्वर ॥ केला साष्टांग नमस्कार ॥ आलिंगन देऊनि निजकरें ॥ बोलती उत्तर एकमेकां ॥८॥
यवनभाषेनें अनसूयासुत ॥ जनर्दनासी काय बोलत ॥ क्षुधा लागली आम्हां बहुत ॥ तरी भोजन त्वरित करावें ॥९॥
मग मृत्तिकापात्र सत्वर काढोनी ॥ त्यामाजी स्वकरें दोहिली शुनी ॥ तिच्या दुग्धांत अन्न चुरोनी ॥ बैसले भोजनीं उभयतां ॥११०॥
सद्गुरु म्हणती जनार्दना ॥ पैल तो कोण दिसतो नयना ॥ तयासी पाचारूनि आणा ॥ सवें भोजना बैसावया ॥११॥
वचन ऐकूनि एकनाथ ॥ मनांत जाहले संकोचित ॥ म्हणे साक्षात फकीर दिसत ॥ कैसें अनुचित करावें ॥१२॥
जनार्दन दाखविती निजखूण ॥ तुज मागें दिधली शिकवण ॥ त्या जगद्गुरूचें जाहलें दर्शन ॥ तरी प्रसाद घेऊन जाईं कां ॥१३॥
मग एकनाथ संकोच करूनि चित्त ॥ समीप आले भीतभीत ॥ म्हणे समागमें न बैसें निश्चित ॥ तरी प्रसाद त्वरित मज द्यावा ॥१४॥
तेव्हां उच्छिष्ट ग्रास निजप्रीतीं ॥ जनार्दन देत तयाहातीं ॥ तो वस्त्राचे पदरीं बांधोनि निश्चितीं ॥ निवांतस्थिती बैसले ॥१५॥
भोजन समाप्त होतां पाहें ॥ जनार्दनासी बोलती दत्तात्रेय ॥ पैल तो मूल कोण आहे ॥ सांग लवलाहें आम्हांसी ॥१६॥
मग एकनाथासी बोलावूनि लवलाहीं ॥ उचलोनि घातला स्वामींचे पायीं ॥ त्यांनीं आश्वासन देऊनि पाहीं ॥ वरदान कांहीं बोलत ॥१७॥
श्रुतिशास्त्रांचें जें मंथित ॥ व्यासें काढिलें श्रीभागवत ॥ त्याचा अर्थ सखोल गुप्त ॥ वदेल प्राकृत प्रसिद्ध हा ॥१८॥
आणिक भावार्थरामायण ॥ वदेल रसाळ निरूपण ॥ तें श्रवण करितां प्रीतीकरून ॥ तरतील जन सकळिक ॥१९॥
आणिक पदपदांतरें बहुत ॥ श्रीहरिचरित्र अति अद्भुत ॥ कीर्तनीं गाऊनि प्रेमयुक्त ॥ उद्धरील पतित श्रवणामात्रें ॥१२०॥
ऐसा वर देऊनि सत्वर ॥ मस्तकीं ठेविला अभयकर ॥ निमिष लोटतां साचार ॥ अदृश्य जाहले तेधवां ॥२१॥
जनार्दन म्हणे एकनाथा ॥ आजि तरी यथार्थ वाटलें चित्ता ॥ तुजला प्रसाद दिधला होता ॥ तो ठेविला केउता मज सांग ॥२२॥
येरू यथार्थ बोले वचन ॥ तो ग्रास म्यां दिधला टाकून ॥ मग जनार्दनें तांबूल काढोन ॥ निजकरें मुखांत घातले ॥२३॥
एकनाथासी धरूनि हातीं ॥ मंदिरांत आले त्वरितगती ॥ एकमेकांसी न विसंबती ॥ जेवीं लेंकुराप्रती निजमाय ॥२४॥
आणि तान्हयासी न पडे मायेचा विसर ॥ हे परस्परें साक्ष देतसे अंतर ॥ तेवीं एकनाथ जनार्दन निरंतर ॥ असती साचार एकचित्तें ॥२५॥
दीपक आणि प्रकाशज्योती ॥ कीं सुवर्ण आणि त्याची कांती ॥ द्रवत्व आणि उदक निश्चितीं ॥ अभिन्न असती एकत्वें ॥२६॥
कीं रवि आणि त्यांचीं किरणें ॥ कीं चंद्र आणि शीतळत्व जाण ॥ कीं समीर आणि चंचलपण ॥ अभिन्नपणें असतीं कीं ॥२७॥
समुद्र आणि कल्लोळ कैसे ॥ कीं भिन्नपणें एकत्र जैसे ॥ अमृत आणि स्वादरसें ॥ एकत्रपणें नांदती ॥२८॥
कीं अवधान आणि श्रवण ॥ कीं पृथ्वी आणि घनवटपण ॥ अध्यात्म आणि सत्त्वगुण ॥ नामाभिधानें वेगळालीं ॥२९॥
तेवीं जनार्दन आणि एकनाथ ॥ नामें दोन परी अभिन्न असत ॥ एकमेकांसी न विसंबत ॥ कासावीस आप्त जयापरी ॥१३०॥
तंव कोणे एके दिवसीं ॥ जनार्दन विचारी मानसीं ॥ आतां सेवा घेणें याजपासीं ॥ अनुचित मजसी दिसताहे ॥३१॥
मग एकनाथासी बोलती वचन ॥ माझी आज्ञा तुज प्रमाण ॥ तरी आतां प्रतिष्ठानासी जाऊन ॥ गृहस्थाश्रम चालवीं ॥३२॥
स्नान संध्या देवतार्चन ॥ वैश्वदेवादिन अतिथिपूजन ॥ नित्यनैमित्तिकर्माचरण ॥ दाखवी वर्तवून लोकांसी ॥३३॥
तूं अध्यात्मज्ञानीं प्रवीण ह्प्सी ॥ परी सर्वथा नसोडी सत्कर्मासी ॥ नदीपार जाहलिया आपणसी ॥ तरी केवीं नावेसी फोडावें ॥३४॥
तेवीं मिथ्या कर्म कळलें अंतरीं ॥ तरी वर्तावें लोकाचारीं ॥ यथाविधि वर्तोनि निर्धारीं ॥ मग तें ईश्वरीं अर्पावें ॥३५॥
हें वचन प्रमाण करितां त्वरित ॥ तुज प्रसन्न होईल रुक्मिणीकांत ॥ जनार्दनें मस्तकीं ठेविला हात ॥ प्रतिष्ठानीं त्वरित चालिले ॥३६॥
सद्गुरुवचन हेंचि प्रमाण ॥ त्याहूनि वरिष्ठ नव्हेचि साधन ॥ हे गुरुभक्तचि जाणती खूण ॥ इतरांकारण न घडेचि ॥३७॥
मग तें निजमंदिरा येऊन ॥ वडील वृद्धांस केलें नमन ॥ पुत्र देखतां त्यांजकारण ॥ समाधान वाटलें ॥३८॥
स्नान संध्या देवतार्चन ॥ मातापित्यांचें करी सेवन ॥ ऋतुकाळीं स्वदारागमन ॥ विधिआज्ञेनें करीतसे ॥३९॥
न करी कोणाचें उपार्जन ॥ दृष्टीस न येती थोर सान ॥ चराचर जें जें दिसे आन ॥ तें तें जनार्दन भासत ॥१४०॥
घरीं पुरातन पांडुरंगमूर्ती ॥ एकनाथ पूजी निजप्रीतीं ॥ जैसी बोलिली शास्त्रीं नीती ॥ तैशाच रीतीं अर्चीतसे ॥४१॥
नानापरीचीं सुमन चंदन ॥ परीमळ उपचार सुगंध भूषण ॥ धूप दीप कर्पूर नीरांजन ॥ नैवेद्यअर्पण निजभावें ॥४२॥
पुष्पांजलि स्तोत्रें पढोनि नाना ॥ देवासी घालीतसे प्रदक्षिणा ॥ मग साष्टांग नमस्कार घालोनि जाणा ॥ भाकीत करुणा अनुतापें ॥४३॥
जय पतितपावना जगदुद्धारा ॥ द्वारकावासिया रुक्मिणीवरा ॥ अनाथनाथा करुणाकरा ॥ सर्वेश्वरा पांडुरंगा ॥४४॥
मी अनन्यभावें तुज शरण ॥ म्हणूनि पुढती करितों नमन ॥ मग तुलसी प्रसाद घेऊन ॥ तीर्थ प्राशन करीतसे ॥४५॥
ब्राह्मण घेऊनियां पंक्तीं ॥ भोजन करीत निजप्रीतीं ॥ तृतीयप्रहरीं पुराणव्युत्पत्ती ॥ श्रवण करीत सद्भावें ॥४६॥
रात्रीं आरंभी हरिकीर्तन ॥ श्रवणासी येती भाविक जन ॥ एकनाथाचें ऐकोनि वचन ॥ होती तल्लीन नरनारी ॥४७॥
जनार्दनाचे कृपेंकरूनी ॥ कवित्व बोलती प्रसादवाणी ॥ संत सज्जन ऐकती कानीं ॥ संतोष मनीं मानित ॥४८॥
एके दिवसीं एकनाथ ॥ निद्रित होते यामिनींत ॥ तों स्वप्नीं येऊनि श्रीरघुनाथ ॥ काय बोलत तयासी ॥४९॥
म्हणे वाल्मीकिकृत रामायण ॥ संस्कृत वाणी न कळे गहन ॥ यावरी महाराष्ट्र टीका करून ॥ जनांकारणें सांगावी ॥१५०॥
ऐसें स्वप्न देखतांचि जाण ॥ जागृतीस आले न लागतां क्षण ॥ तेचि आज्ञा करूनि प्रमाण ॥ आरंभी रामायण प्राकृत ॥५१॥
सुदिन पाहोनि एके दिनीं ॥ सप्त कांडें पाहिलीं शोधोनी ॥ तो अभिप्राय ध्यानीं आणोनी ॥ एकनाथ मनीं तल्लीन ॥५२॥
म्हणे याचा अर्थ सखोल गहन ॥ मी प्राकृत काय बोलों जाण ॥ परी जनार्दनाचे कृपेंकरून ॥ ग्रंथ वदेन यथामती ॥५३॥
बालकांड आरंभितांचि जाण ॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण ॥ गणपतिसरस्वतींचे वंदोनि चरण ॥ सद्गुरुस्तवन मग केलें ॥५४॥
प्रार्थूनि संतसज्जनमूर्ती ॥ ग्रंथ आरंभिला एकनाथीं ॥ सद्भावें बोलिला वचनोक्ती ॥ मग भावार्थ म्हणती रामायण ॥५५॥
मुखीं बैसोनि श्रीरघुनाथ ॥ ग्रंथ वदविती यथार्थ ॥ एकनाथ पुढें निमित्तमात्र ॥ जाणती पवित्र निजभक्त ॥५६॥
परी एक गृहस्थ होता शेजारी ॥ तो नित्य त्याची निंदा करी ॥ म्हणे प्राकृत टीका संस्कृतावरी ॥ एकनाथ करी कासया ॥५७॥
कोणी भाविक होते प्रेमळ ॥ ते याचें कवित्व म्हणती रसाळ ॥ श्रवणीं पडतांचि तत्काळ ॥ राहे तळमळ चित्ताची ॥५८॥
एके दिवसीं रात्रींत ॥ निद्रित झाले एकनाथ ॥ तों स्वप्नीं येऊनि जानकीकांत ॥ काय बोलत तयासी ॥५९॥
आतां निद्रा आळस टाकूनि जाण ॥ लिहीत बैसें रामायण ॥ तुझें मुखींचें रसाळ भाषण ॥ मजकारणें आवडे ॥१६०॥
दौत लेखणी पत्र हातीं ॥ आणोनि देत अयोध्यापती ॥ जागृत होऊनि जंव पाहाती ॥ तंव दृष्टीस न दिसती श्रीराम ॥६१॥
मग करूनि रघुनाथस्मरण ॥ लिहीत बैसले रामायण ॥ तों अद्भुत वर्तलें गहन ॥ तें परिसा सज्जन निजप्रीतीं ॥६२॥
सीताशुद्धीसी जातां मारुती॥ ते कथा लिहितां सप्रेम चित्तीं ॥ एकनाथासी नसे देहभ्रांती ॥ मीपण निश्चितीं स्फुरेना ॥६३॥
महेंद्र पार्वतावरूनी ॥ हनुमंत उडाला जये क्षणीं ॥ ते ओंवी लिहितां यालागूनी ॥ आविर्भाव मनीं दाटला ॥६४॥
तो प्रेमा दाटोनि मनांत ॥ मग उडोनि चालिले एकनाथ ॥ शेजारियाचे वाड्यांत ॥ पडिले अवचित अर्धरात्रीं ॥६५॥
गृहस्थ होऊनियां जागृत ॥ अंगणीं येऊनि जंव पाहात ॥ तों मूर्च्छित पडिले एकनाथ ॥ देखोनि विस्मित अंतरीं ॥६६॥
मग हातींचें पत्र घेऊनी ॥ वाचूनि पाहे तये क्षणीं ॥ तेव्हां तो उमजला आपुलें मनीं ॥ म्हणे प्रेमेंकरूनि उडाले ॥६७॥
गृहस्थ पुसतसे वर्तमान ॥ किमर्थ येथें पडिलां येऊन ॥ परी त्यासी नाहीं देहभान ॥ कांहीं वचन न बोलत ॥६८॥
ऐसी स्थिति देखतां सत्य ॥ अनुताप जाहला चित्तांत ॥ म्हणे एकनाथ अवतार मूर्तिमंत ॥ म्यां निंदिलें व्यर्थ याप्रती ॥६९॥
मग आपुले पाठीवर बांधोनि सत्वरी ॥ नेऊनि बैसविलें त्याचें मंदिरीं ॥ एकनाथ सावध होऊनि लवकरी ॥ लेखन करीत बैसले ॥१७०॥
गृहस्थें करूनियां नमन ॥ आपुलें गृहा गेला जाण ॥ म्हणे एकनाथाचा उपदेश घेईन ॥ विचार त्यानें दृढ केला ॥७१॥
चमत्कार देखिला अति अद्भुत ॥ मग तयावरी जरी बैसला हेत ॥ तरी तो नव्हे शुद्ध भावार्थ ॥ दांभिक निश्चित या नांव ॥७२॥
परिसाचा देव जाणत केला ॥ मग देव्हारीं षोडशोपचारें पूजिला ॥ ऐसा भक्तभावार्थ देखिला ॥ तरी दांभिक त्याजला म्हणावें ॥७३॥
कामधेनूचा चमत्कार देखोनि जाणा ॥ मग तीस घातल्या प्रदक्षिणा ॥ त्यांच्या सद्भावाच्या खुणा ॥ कळती सज्ञाना भाविकां ॥७४॥
कल्पतरूसी ओळखोनी ॥ मग कामनिक त्यासी घालिती पाणी ॥ त्यासी परोपकारी म्हणतां कोणी ॥ तरी यथार्थ सज्जनीं न म्हणावें ॥७५॥
तेवीं संतांचा उपहास आधीं केला ॥ मग चमत्कार पाहोनि भावार्थ जडला ॥ तरी दांभिक म्हणावें त्याला ॥ अन्यथा बोल असेना ॥७६॥
वैभव पातले सोयर्‍यासी ॥ मग पिशुन आदर करिती त्यासी ॥ परी मागील अपमान आठवणें मानसीं ॥ प्रशस्त त्यासी वाटेना ॥७७॥
तेवीं गृहस्थें उपहास आधीं केला ॥ मग चमत्कार पाहोनि शरण आला ॥ परी एकनाथासी दांभिक भासला ॥ वृत्तांत पहिला आठवूनि ॥७८॥
एके दिवसीं जनार्दनसुत ॥ एकांतीं बैसले देवघरांत ॥ तों गृहस्थ सत्वर येऊनि तेथ ॥ प्रार्थना करीत तयाची ॥७९॥
म्हणे स्वामी तुमचा महिमा नेणतां ॥ म्यां मागें उपहास केला वृथा ॥ आतां भावार्थ धरूनि चित्ता ॥ आलों समर्था तुजपासीं ॥१८०॥
तरी माझें मस्तकीं ठेवूनि हात ॥ उपदेश द्यावा जी त्वरित ॥ वचन ऐकोनि एकनाथ ॥ राहिले निवांत उगेचि ॥८१॥
म्हणती अधिकार न पाहतां कांहीं ॥ कैसा करावा सांप्रदायी ॥ बरड भूमि असतां पाहीं ॥ तेथें सर्वथा कांहीं न पेरावें ॥८२॥
कुळासी नाहीं ठाव ठिकाण ॥ तयासी सर्व न द्यावें धन ॥ कुंभ्ह फुटका न पाहतां जाण ॥ तरी तयांत जीवन भरूं नये ॥८३॥
ऐसें म्हणोनि एकनाथ ॥ गृहस्थासी काय उत्तर देत ॥ तुम्हीं आपणायोग्य पाहूनि समर्थ ॥ तयासीं भावार्थ धरावा ॥८४॥
ऐसें तयासी म्हणतां पाहीं ॥ परी तो सर्वथा नायके कांहीं ॥ म्हणे तुम्हांविण उपदेश घेणें नाहीं ॥ म्हणूनि पायीं लागला ॥८५॥
त्याचे भिडेस्तव बाह्यात्कारें ॥ म्हणे उदयीक मुहूर्त आहे बरें ॥ तुम्हीं स्नान करूनि सत्वरें ॥ यावें ऐसें बोलिले ॥८६॥
मग गृहस्थ उठोनि गेलिया घरीं ॥ एकनाथ विचार करिती अंतरीं ॥ म्हणती आळसी कृपणासी उपदेश सत्वरीं ॥ देऊं नयेचि सर्वथा ॥८७॥
उदयीक स्नान करूनि त्वरित ॥ देउळासी आले जनार्दनसुत ॥ घरच्या मनुष्यांसी काय सांगत ॥ अगोदक येथें न ठेवावें ॥८८॥
आम्हीं हाक मारिलिया सत्वर ॥ परी कोणींच न द्यावें प्रत्युत्तर ॥ ऐसा दृढ सांगोनि विचार ॥ मग मानसपूजेसी बैसले ॥८९॥
तों गृहस्थ स्नान करूनि त्वरित ॥ सत्वर आले देवघरांत ॥ तंव एकनाथ बैसले ध्यानस्थ ॥ मुखीं जपत कृष्णनाम ॥१९०॥
विचार करिती आपुल्या चित्ता ॥ याची परीक्षा पाहावी आतां ॥ दाम्भ्हिक असला तरी सर्वथा ॥ उपदेश वृथा देऊं नये ॥९१॥
मग हांक मारूनि मंदिरांत ॥ घरच्या मनुष्यांसी काय बोलत ॥ अग्रोदक ठेविलें नाहीं येथ ॥ काय निमित्त पैं आजि ॥९२॥
मागुती सांगती ते अवसरीं ॥ आतां तरी आणूनि द्या झडकरी ॥ परी कोणीच न बोलती मंदिरीं ॥ मग एकनाथ झडकरी ऊठिले ॥९३॥
हातीं चंबू घेऊनि त्वरित ॥ म्हणे कोणी उदक द्यावया नाहीं येथ ॥ मग आपणचि जाऊनि मंदिरांत ॥ अग्रोदक निश्चित आणिलें ॥९४॥
गृहस्थाची परीक्षा घेऊनि ऐसी ॥ एकनाथ लागला देवपूजेसी ॥ मनांत म्हणे हा कुटिल आळसी ॥ तरी उपदेश यासी देऊं नये ॥९५॥
जो फुकाचें उदक नेदी देवा ॥ तो काय पुढें करील सेवा ॥ जो नमस्कार न करी भूदेवा ॥ तो पक्वान्न जेवाया नेदीच ॥९६॥
जो वाट न सांगे पथिकासी ॥ तो मंदिरा ठाव दे केवीं त्यासी ॥ कीं जो बैसावया नेदी पाहुण्यासी ॥ तो शिरपाव डोईसी बांधीना ॥९७॥
तेवीं फुकाचें आणोनि नेदी जीवन ॥ तो पुढें काय करी साधन ॥ ऐसें मनांत विचारून ॥ करीत पूजन श्रीहरीचें ॥९८॥
यावरी गृहस्थ काय बोलत ॥ माझें मस्तकीं ठेवा हात ॥ एकनाथ म्हणती टळला मुहूर्त ॥ आतां नाहीं दिसत यापुढें ॥९९॥
वचन ऐकोनि त्या अवसरीं ॥ गृहस्थ गेला निजमंदिरीं ॥ एकनाथाच्या अंतरीं ॥ समाधान वाटलें ॥२००॥
म्हणे दांभिकपण व्यर्थ वायां ॥ आम्हांसी सांप्रदायीं पाहिजे कासया ॥ तरी सर्व उपाधि टाकोनियां ॥ पंढरीराया भजावें ॥१॥
जनार्दनाचें तान्हया बाळका ॥ कासया पाहिजेत शिष्यशाखा ॥ अंगा जाणीव येईल देखा ॥ म्हणोनि आशंका वाटत ॥२॥
यापरी असोनि वैराग्यभरित ॥ भजन करिती एकनाथ ॥ पुढें द्वारकेहूनि श्रीकृष्णनाथ ॥ सेवेसी येतील निजांगें ॥३॥
ते कथा कानीं ऐकतां फुडी ॥ श्रोतयां अधिक लागेल गोडी ॥ मग भवरोगाची दिसते वांकडी ॥ जे जाईल रोकडी उठाउठीं ॥४॥
म्हणोनि श्रोतयां पुढतपुढती ॥ विनंती करी महीपती ॥ कथाश्रवणीं लावूनि प्रीती ॥ अवधान चित्तीं असावें ॥५॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ पंचचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥२०६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीभक्तविजय पंचचत्वारिंशाध्याय समाप्त ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय ४४