तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. तेलंगणातील भद्राडी कोठागुडेम जिल्ह्याचे एसपी सुनील दत्त यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या किस्ताराम पोलीस स्टेशन परिसरातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईत तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, शोध मोहिमे दरम्यान नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त मोहिमे अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना ठार केले.
पोलीस आणि सीआरपीएफ जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक अजूनही सुरूच आहे. एसपी सुनील दत्त म्हणाले की, संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.