महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘एसईबीसी’चे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात याव्यात. जोपर्यंत वटहुकूम जारी होत नाही, तोपर्यंत परीक्षा घेण्यात येऊ नयेत. अन्यथा, 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकाही परिक्षा केंद्रावर परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे MPSC येत्या ११ आक्टोबर व २२ नोव्हेंबर २०२० रोजी अनुक्रमे राजपत्रित व अराजपत्रिक (SIT,PSI,ASO) व इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती पुर्वीची असून संबंधित अर्जामध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पाश्र्वभूमीवर MPSC मधील SEBC च्या आरक्षणावरील शासनाची भूमिका जाहिर न करताच MPSC च्या परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.