केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात, अशी टीका केली आहे.
“रावसाहेब दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अश्या प्रकारची वक्तव्य करावी लागतात. या देशासाठी काँग्रेस पक्षाचा तसंच काँग्रेस नेतृत्वाचा त्याग आहे. जवाहरलाल नेहरु 13 वर्ष जेलमध्ये राहिले, इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. काँग्रेसचा इतका त्याग असताना भाजपचा देशासाठी काय त्याग आहे?”, असा सवाल करत भाजप काँग्रेसशी बरोबरी देखील करु शकत नाही, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
“भाजपची भूमिका नेहमीच द्वेषाची राहिलेली आहे. देशातल्या विविध जातिधर्मांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची यांची भूमिका राहिलेली आहे. लोकांची आपसात तंटे कसे लागतील आणि त्याचा राजकीयदृष्ट्या आपल्याला फायदा कसा होईल, हाच डाव भाजप खेळत आलं आहे, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. दानवेंच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, असं ठाकरे म्हणाले.