चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर विविध ठिकाणी पुरात बुडाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून चिपळुणात पाणी भरण्यास सुरुवात झाली. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात आहे. हे कोविड रुग्णालय असून तेथे २१ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील काहीजण व्हेंटिलेटरवर होते. चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्येही संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला. त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी आणि चिखल झाला. त्यामुळे या कोविड सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या ८ रुग्णांचा मृत्यू झाला.
चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्याने संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन रुग्णांना पटापट बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र, कंबरेभर पाणी,अंधार यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.या कोविड सेंटरमध्ये जनरेटर होते. पण कुणालाही जनरेटर चालू कसं करायचं माहीत नव्हतं. त्यामुळे कोविड सेंटरमधला वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही. परिणामी व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा होता. एकूण ३० सिलेंडर रुग्णालयात होते. पण जनरेटरवर पाणी गेल्यामुळे जनरेटर बंद झालं आणि मॉनिटरवर त्याचा परिणाम झाला. पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण कोविड सेंटर उद्ध्वस्त झालं आहे. प्रत्येक वॉर्डात पाणी भरलं आहे. चिखलाचं साम्राज्य झालं आहे. रुग्णालयाच्या बाहेरही प्रचंड घाण झाली आहे. रुग्णवाहिका पाण्यात बुडाल्या आहेत. तर कोविड सेंटरवरचे पत्रे उडाली आहे.