ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत”असे सांगितले.