फुटपाथच्या कामातून पैसै खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या लोकांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोय.मग असेच तरुण मरणार! UPSC, MPSC करणारे मरणार,शेतकरी मरणार,कलाकार मरणार, लेखक मरणार.काल एक कलादिग्दर्शक मेला.जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणाशी संबंधित लोक जिवंत राहणार.'अशी खंत सिने दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी व्यक्त केली.
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना प्रविण तरडे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
प्रविण तरडे म्हणाले, हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार,या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला,अशा दररोज चर्चा सुरू आहेत.या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का? 12-13 आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना वेळ नाहीये दिल्लीत हेच चाललंय,महाराष्ट्रात हेच चालू आहे.सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?, असा रोखठोक सवाल तरडे यांनी केला.
राजकारणी यांच्याबद्दल काही बोलायला जावं तर ट्रोल करतात. ट्रोल करणाऱ्यांना हे माहिती नाहीये की, एक दिवस आपल्याच घरातील कुणीतरी मरणार आहे. या देशात आणि राज्यात सुखी फक्त हेच (राजकारणी) लोक जिवंत राहणार आहेत,अशी खंत प्रविण तरडे यांनी व्यक्त केली.
अभ्यास करून आणि आईबापांची स्वप्न पाहून तुम्ही इथपर्यंत आला आहात.कुठल्यातरी फालतू सिस्टिमसाठी स्वतःचा अमूल्य जीव वाया घालवू नका. संयम ठेवा आणि प्रशासकीय सेवेत जाऊन यांना उघडं पाडा, असं आवाहन प्रवीण तरडे यांनी यावेळी केले.