Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

400 वर्षांपूर्वी नहरींच्या जाळ्यातून मलिक अंबरने असा सोडवला होता औरंगाबादचा पाणीप्रश्न

Webdunia
मंगळवार, 28 मे 2024 (09:36 IST)
कुठे आठ दिवस पाण्याची वाट पाहावी लागते, तर कुठे रोज दोन हंडे पाण्यासाठी टँकरमागे धावावं लागतं. अनेकांना तर पाण्यासाठी विकतचे टँकर मागवावे लागतात, त्याचाही दर हंगामात 800 ते 1000 रुपयांपर्यंत जातो.
 
सुरुवातीला हे वर्णन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या एखाद्या दुर्गम ठिकाणाचं आहे असं वाटत असलं तरी तसं नाही. कारण एकेकाळी राज्यातलं सर्वात वेगान विकसित होणारं शहर अशी ओळख मिळवलेल्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद)मधली ही सद्यस्थिती आहे.
 
अनेक वर्षांपासून रखडलेली पाणी योजना, पावसाचा अभाव आणि पाण्यासाठी एकाच स्रोतावर असलेलं अवलंबित्व या कारणांमुळं जवळपास दरवर्षीच छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागतो.
 
कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्यासाठीच्या धावपळीचं हे चित्र महाराष्ट्रातील इतरही अनेक भागांमध्ये पाहायला मिळतं. त्यात मराठवाड्यासारख्या भागांमध्ये तर एक वर्ष जरी अपुरा पाऊस पडला तरी दुष्काळी स्थिती निर्माण होते. यंदाही अशाच परिस्थितीचा सामना अनेक ठिकाणी करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
या परिस्थितीत मागे वळून पाहिलं, तर आपण इतिहासाकडून काहीही धडाच घेतला नाही का? असं वाटल्याशिवाय राहत नाही. कारण इतिहासामध्ये डोकावून पाहिल्यास शहरांच्या रचनांचा विचार करता त्याकाळी पाण्याचं अत्यंत उत्तम व्यवस्थापन झालं होतं असं पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी त्याची उदाहरणं समोर आली आहेत.
 
अनेक मोठ्या संस्कृतींचाही त्यांच्या आसपास असलेल्या जलस्रोतांशी अगदी जवळचा संबंध असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. अशाच एका जलस्रोताच्या आणि ऐतिहासिक जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण असलेल्या मराठवड्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील नहर-ए-अंबरीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
 
या भागात जवळपास 14 नहरी आहेत. त्यात नहर-ए-अंबरीबरोबरच प्रसिद्ध पाणचक्कीच्या नहरीचाही समावेश आहे. त्यात नहर ए अंबरी लांब आणि विशेष महत्त्वं असलेली अशी नहर आहे.
विशेष म्हणजे ही काही नैसर्गिक नहर नव्हती. तर नैसर्गिक आणि भौगोलिक स्थितीचा वापर करून तयार केलेली जलयंत्रणा होती. त्यासाठी पाण्याचा स्त्रोत मात्र नैसर्गिक होता. तरीही बारामाही पाण्याची सोय त्यातून करण्यात आलेली होती. त्याचं ऐतिहासिक महत्त्व, वैशिष्ट्ये, त्यामागचे अभियांत्रिकी कौशल्य आणि आजच्या काळातही ही नहर कशी उपयोगी ठरू शकते, अशा विविध पैलूंच्या आधारे आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
 
या नहरीची संकल्पना, अभियांत्रिकी यामागे इतिहासातील एक मोठं नाव होतं, ते म्हणजे मलिक अंबर. नहरीबद्दल जाणून घेण्यापूर्वी मलिक अंबरबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.
 
गुलामीतून सुरू झाला मलिक अंबरचा प्रवास
नहर ए अंबरी हा मोठा ऐतिहासिक वारसा देणारा मलिक अंबर नेमका कोण होता? बीबीसीने 'इनकार्नेशन्स' नावाची मालिका केली होती. त्यात इतिहासकार सुनील खिलनानी यांनी मलिक अंबरचे सविस्तर वर्णन केलं आहे.
 
मलिक अंबरचा जन्म सोळाव्या शतकाच्या मध्यात अबिसिनिया म्हणजे आताच्या इथियोपियामध्ये झाला होता. त्यांचं बालपणीचं नाव चापू होतं. आई वडिलांनीच त्याची लहानपणी गुलाम म्हणून विक्री केली असावी अशी माहिती आहे.
 
पुढं गुलाम म्हणून अनेक वेळा मलिक अंबरची खरेदी विक्री झाली आणि अखेर तो भारतात आला. सौदी अरबमधून एका जहाजाद्वारे त्याला भारतात, महाराष्ट्रातील कोकण भागात पाठवण्यात आलं होतं.
 
मलिक अंबर भारतात किंवा महाराष्ट्रात आला तेव्हा निजामशाहीचा सरदार चंगेज खान हा त्याचा मालक होता. मलिक अंबर गुलाम असला तरी प्रचंड हुशार होता. त्यामुळं त्याला चंगेज खानकडून आर्थिक व्यवहारांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर अभियांत्रिकीमध्येही त्याचं वाखाणण्याजोगं असं कौशल्य होतं.
 
गुलाम असलेल्या मलिक अंबरनं हळूहळू मालक चंगेज खानकडून राजकीय डावपेचही शिकायला सुरुवात केली. हा चंगेज खानच मलिक अंबरचा शेवटचा मालक होता. त्यामुळं एकाअर्थानं भारतात येणं त्याच्यासाठी लाभदायक ठरलं. चंगेज खानचा मृत्यू झाला तेव्हा मलिक अंबर हा तरुण होता.
 
मुळात मलिक अंबर प्रचंड हुशार आणि महत्त्वाकांक्षी तर होताच आणि आता तो स्वतंत्रही झाला होता. स्वतंत्र झाल्यानंतर मलिक अंबरनं 20 वर्षं सैन्य उभारण्यासाठी घालवले. त्यासाठी त्यानं प्रचंड परिश्रम घेतले. त्यामुळं 1595 पर्यंत मोठं सैन्यदल निर्माण करण्यात त्याला यश आलं.
 
या सैन्याच्या बळावर मलिक अंबर सुलतान मूर्तझा निझाम शाह द्वितीय याचा सरदार बनला. हा सुलतान मलिक अंबरच्या सैन्यावर खूप जास्त प्रमाणात अवलंबून होता. सुलतानाकडून लढताना मुघल सैन्याबरोबर मलिक अंबरचा प्रचंड संघर्ष झाला. त्यानं मुघलांना चांगलंच झुलवलंही होतं.
 
मलिक अंबरच्या सैन्यात जवळपास 50 हजार सैनिक होते. सैन्याची उभारणी करताना 20 वर्षांदरम्यानच्या अनुभवांमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मलिक अंबरला चांगली माहिती झालेली होती.
 
1610 मध्ये मलिक अंबरनं दौलताबादच्या अभेद्य किल्ल्यावर ताबाही मिळवला. त्यानंतर आताचे छत्रपती संभाजीनगर असलेल्या खडकी या गावाला त्यानं राजधानी बनवली आणि त्याभोवती सैन्य छावण्या उभारल्या.
 
नहर बांधण्यामागची पार्श्वभूमी
छत्रपती संभाजीनगरमधील इतिहास अभ्यासक आणि नहरीवर विशेष अभ्यास असलेल्या दुलारी कुरेशी या सध्या कॅनडामध्ये स्थायिक झाल्या आहेत. त्यांना या नहरीचा विचार मलिक अंबरला कसा आला याबाबत माहिती दिली.
 
दुलारी कुरेशी यांच्या मते, "मलिक अंबर अहमदनगरच्या निजामशाहीचा पंतप्रधान होता. त्यावेळी बलाढ्य मुघलांकडून होणाऱ्या हल्ल्यानं निजामशाही त्रस्त होती. त्याच काळात मलिक अंबरनं निजामशाहीसाठी मुघलांविरोधात अनेक लढाया लढल्या. मुघलांच्या शक्तीपुढं मलिक अंबरच्या सैन्याला चांगलाच संघर्ष करावा लागत होता."
 
"पण जवळपास वर्षभरानंतर छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा (सध्या विमानतळ असलेला भाग) परिसरात मलिक अंबरला मुघलांच्या विरोधातला पहिला मोठा विजय मिळाला," असं दुलारी कुरेशी सांगतात.
 
“या विजयामुळं हा सपूर्ण परिसर किंवा ठिकाण आपल्यासाठी लाभदायक ठरलं असा विचार मलिक अंबरनं केला. त्यामुळं त्यानं याठिकाणी शहर उभारून राजधानी करण्याचं ठरवलं.
 
"पण एवढं मोठं शहर त्याठिकाणचे नागरिक, सैन्य यांच्यासाठी सर्वात मूलभूत गरज होती पाण्याची. त्यावेळी या शहरासाठी पाण्याचा एकच मुख्य स्त्रोत होता तो म्हणजे खाम नदी. पण त्यातलं पाणी शहराला पुरेसं पडणार नाही याची मलिक अंबरला जाणीव झाली होती,” असंही दुलारी कुरेशी यांनी सांगितलं.
 
मलिक अंबरनं सौदी अरेबियाच्या काझीकडून अभियांत्रिकीचे धडे गिरवलेले होते. तसंच तो वास्तुविशारदही होता. त्यामुळं त्यानं इराण आणि सिरियाच्या धर्तीवर याठिकाणीही एक जलयंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
 
नव्यानं निर्माण केलेल्या राजधानीच्या शहराच्या नागरिकांसाठीच मलिक अंबरनं 1618 मध्ये या ऐतिहासिक नहर ए अंबरीची निर्मिती केली होती. पण याच शहराची राजधानी निवड करण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली होती, अशी माहिती कुरेशी यांनी दिली.
 
सायफन तंत्रज्ञानानुसार नहरीची रचना
छत्रपती संभाजीनगरमधील इतिहास अभ्यास डॉ. शेख रमजान यांनी या नहरीचा सखोल अभ्यास केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या 400 इअर्स अंडरग्राऊंड लिव्हिंग अॅक्वेडक्ट या पुस्तकात दिली आहे. आकृत्यांच्या माध्यमातून यातून त्यांनी या नहरींची रचना सविस्तरपणे मांडलेली आहे.
 
400 वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञान किंवा इतर सुविधा उपलब्ध नव्हता. तरीही शहराला पाणीपुरवठा करता येईल अशाप्रकारची ही जमिनीखालील नहर यंत्रणा मलिक अंबरनं तयार करून घेतली होती. ही नहर तयार करण्यासाठी त्यानं सायफन तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
 
‘सायफन’ तंत्रज्ञानाचा अगदी साधा अर्थ सांगायचा झाल्यास गुरुत्वाकर्षण असा सांगता येऊ शकतो. नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीद्वारे गुरुत्वाकर्षणाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी वाहून नेण्याच्या या पद्धतीला सायफन तंत्रज्ञान असं म्हटलं जातं.
 
ही नहर ईसवीसन 1618 मध्ये तयार करण्यात आली होती, असं डॉ. रमजान यांनी पुस्तकाच म्हटलं आहे. एवढ्या वर्षांनंतरही या नहरीमध्ये अजूनही स्वच्छ पाण्याचे जीवंत झरे आहेत. संपूर्ण जमिनीखालून तयार करण्यात आलेल्या या नहरीची लांबी जवळपास अडिच मैल एवढी आहे, असं रमजान शेख यांनी सांगितलं.
 
‘जोबन’ टेकडीपासून सुरुवात
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर अवलंबून असलेल्या या नहरीसाठी टेकड्यांवरून उताराने पाणी शहरात आणण्यात आलं होतं. मलिक अंबरनं यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या जोबन टेकडी नावाच्या टेकडीची निवड केली होती, असं दुलारी कुरेशी सांगतात.
 
"याठिकाणी टेकडीच्या उतारावर 48 फूट लांब आणि 5 ते 10 फूट खोल असा एक कालवा खोदला. तिथं पावसाचं पाणी साठवलं जात होतं. हे पाणी जमिनीखालून मातीच्या पाईपलाईनद्वारे गोमुखापर्यंत आणलं जात होतं."
 
"तिथून संपूर्ण शहरामध्ये पाण्याच्या पाईपचं जाळं पसरवण्यात आलेलं होतं. हवेचा दबाव कायम राहावा म्हणून ठिकठिकाणी एअर टॉवर उभे करण्यात आले होते. आजही शहरात अनेकठिकाणी हे टॉवर पाहायला मिळतात," असं कुरेशी सांगतात.
वास्तुविशारद धनश्री मिरजकर यादेखील या नहरीच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वतः या नहरीची स्थिती जाणून घेण्यासाठी या नहरीचे सर्वेक्षण केले आहे. तसंच शोधनिबंधाच्या माध्यमातून या नहरीचं तंत्रज्ञान त्यांनी समोर आणलं आहे.
 
मिरजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नहरीच्या सुरुवातीला साचलेलं पाणी या अडीच मैल लांबीच्या नहरीमधून वाहत शहरापर्यंत पोहोचतं. या संपूर्ण नहरीवर जवळपास 100 मॅनहोल तयार करण्यात आले आहेत. या मॅनहोलला धनश्री मिरजकर यांनी 'जलकुपक' असं नाव दिलं आहे. अनेक ठिकाणी या मॅनहोलमधून या नहरीत खाली उतरण्यासाठी जागाही देण्यात आलेली आहे.
 
पाणी साठवण्यासाठी 691 हौद
नहरीद्वारे शहरात आणलेलं हे पाणी साठवण्याची संपूर्ण शहरांमध्ये हौदांची सोय करण्यात आली होती. मातीच्या पाईप लाईनद्वारे शहरातील वस्त्यांमध्ये असलेल्या हौदांपर्यंत हे पाणी पोहोचवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सर्वामध्ये कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा वापर नव्हता. सर्वकाही केवळ नहरीच्या रचनेच्या माध्यमातून केलं जात होतं.
 
शहरात 691 हौद तयार करण्यात आले होते, असं धनश्री मिरजकर सांगतात. हौदाच्या मध्यभागी असलेल्या कारंज्यामधून हे पाणी हौदात पडत असते. या हौदांच्या माध्यमातून 24 तास पाणी पुरवठा केला जात होता.
 
या पाण्याचा वापर करण्यासाठी करही लावला जात होता. एका अभ्यासानुसार या नहरीच्या माध्यमातून दररोज 3 लाख 75 हजार गॅलन एवढा पाणीपुरवठा होत होता, असं शेख रमजान यांच्या यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
 
नहरीच्या क्षमतेचा विचार करता इतिहासकार अभ्यासकांनी याबद्दल वेग-वेगळी माहिती दिली आहे. पण रमजान शेख यांनी त्याकाळात 2 लाख लोकांची गरज भागवू शकेल एवढं पाणी या नहरीद्वारे पुरवलं जात होतं असा दावा केला आहे. मलिक अंबरचं सैन्य, राजधानी असल्यानं याठिकाणी असलेली बाजारपेठ, सैनिकांची कुटुंबं या सर्वाचा विचार करता हा आकडा योग्य असू शकतो, असाही अंदाज लावला जातो.
 
डॉ. शेख रमजान यांच्या मते, ही नहर पूर्णपणे विटा आणि चुना याचा वापर करून तयार करण्यात आली आहे. त्यामुळं ती अत्यंत मजबूत आहे.
 
बांधकाम आणि नहरीचे इंजिनीअरिंग
छत्रपती संभाजीनगरच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता या शहराच्या आजूबाजूला अनेक टेकड्या आणि डोंगरांनी घेराव घातलेला होता. वाढत्या शहरीकरणाचा फटका बसल्यानं आता टेकड्यांचं प्रमाण कमी झालेलं असतं तरीही ही संख्या अजूनही लक्षणीय आहे.
 
त्यामुळं या नहरीच्या निर्मितीसाठी हे शहर अत्यंत योग्य होतं. या टेकड्यांमुळं मिळणारा उतार हा नहरीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
जवळपास तीन फूट रुंद आणि सात फूट उंच असा या नहरीचा आकार होता. नहरीच्या वर घुमटाच्या आकारासारखं गोलाकार छत केलेलं आहे. त्यामुळं या नहरीमध्ये माती पडण्यापासून संरक्षण होतं. अशाचप्रकारची सुमारे अडिच मैल अंतराची नहर म्हणजे हा एक प्रकारचा भूसुरुंगच तयार करण्यात आला.
 
विशेष म्हणजे पावसाळ्यात किंवा इतर वेळी ही नदीला लागून असल्यानं जमिनीतील पाणी झिरपून यावं म्हणून विटांच्या या बांधकामांमध्ये काही भेगांसारख्या जागा मुद्दाम ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या नहरीच्या तळाशी दगड असल्याचं पाहायला मिळतं.
 
या अडिच मैल अंतराच्या या नहरीवर 100 मॅनहोल बांधण्यात आले आहेत. प्रत्येक मॅनहोलमध्ये 200 फुटांचं अंतर आहे. नहर जमिनीखाली असल्यानं त्यात उतरून स्वच्छता किंवा दुरुस्तीचं काम करता यावं म्हणून ठिकठिकाणी मॅनहोल तयार करण्यात आले आहेत.
 
पावसाळ्यामध्ये नहर पूर्णपणे भरल्यामुळं ओव्हरफ्लो होऊन धोक्याची स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून अत्यंत कुशल पद्धतीनं ओव्हरफ्लोची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ठरावीक उंचीवर पाणी बाहेर पडण्यासाठी जागा केलेली आहे. त्यामुळं ठराविक पातळीपर्यंत आल्यानंतर पाणी आपोआप नहरीतून बाहेर पडतं.
 
ही नहर छत्रपती संभाजीनगरमधील खाम नदीला लागून समांतर अशी होती. त्यामुळं शक्यतो या नहरीला कधीही पाण्याचा तुटवडा जाणवत नसे. त्याचबरोबर नहरीचा उगम असलेल्या डोंगरपायथ्याशी टोपल्याच्या आकाराचा भाग असल्यानं तिथं पाणी भरपूर प्रमाणात साचलेलं असायचं.
 
मिरजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमुख असलेल्या ठिकाणी पाणी शहरात जमा होत असे. तिथून 12 इंच व्यास असलेल्या पाईपलाइनमधून पाणी शहरात बांधलेल्य हौदांमध्ये पोहोचवलं जात होतं.
 
मलिक अंबरचा सामाजिक दृष्टीकोन
गोमुखातून शहरात पाणी पोहोचले जायचे म्हणून हे नहरीचे शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे ठिकाण होते. याठिकाणी बसलेल्या गायीचे शिल्प असून त्या गायीच्या तोंडातून पाणी बाहेर पडायचे.
 
मलिक अंबर मुस्लीम असला तरी त्याच्या मनात हिंदूंबद्दल आदर होता, असं मिरजकर यांनी सांगितलं.
 
हिंदुंसाठी गाय पवित्र असल्यानं गायीच्या तोंडातून बाहेर पडणारं पाणी पवित्र असल्याचं म्हणत त्यांनी ही रचना केली. हिंदू मुस्लीम ऐक्याचं ते उत्तम प्रतीक मानलं जात होतं.
 
मिरजकर यांच्या मते, "श्रीमंत आणि गरीब यांच्यातील सामाजिक दरी दूर व्हावी यासाठी मलिक अंबरनं कायम प्रयत्न केले. मुळात मलिक अंबर स्वतः कायम उच्च वर्गाकडून दाबण्यात आलेल्या वर्गातील होता. त्यामुळं त्यानं पाण्याच्या विभागात मागासवर्गीयांची नियुक्ती केली होती, असं शहरातील काही ज्येष्ठ नागरिक सांगतात."
 
हवेच्या दाबाचा योग्य वापर
शहरात काही ठिकाणी चढ तर काही ठिकाणी उताराचा भाग असतो. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी पाण्याचं समान वाटप व्हावं म्हणून प्रचंड अभियांत्रिकी कौशल्याची गरज होती. ते कौशल्य मलिक अंबरकडं होतं. त्यामुळं 10 ते 25 फुटांपर्यंतच्या उंचीचे अनेक टॉवर हवेचा दाब निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले होते. या दाबाचा वापर करून गरज असेल तिथं अगदी पहिल्या दुसऱ्यामजल्यापर्यंतही पाणी वर चढवलं जात होतं.
 
ही नहर ज्याठिकाणाहून सुरू होते ती जागा टेकडीवर समुद्रसपाटीपासून 2031 फूट उंचीवर आहे. तर ज्याठिकाणी या नहरीचं गोमुख म्हणजे शहरात पाणी येणारी जागा आहे ती समुद्रसपाटीपासून 1954 फूच उंचीवर आहे. म्हणजे उगमापासून मुखापर्यंतच्या उंचीमध्ये 77 फूट एवढा फरक आहे. हा 77 फुटांचा उतार या नहरीचं वैशिष्ट्य आहे.
गरीब श्रीमंतातील सामाजिक दरीचं चित्र त्या काळातही पाहायला मिळतं. कारण त्याकाळीतील दरबारातील अधिकारी, सरदार आणि श्रीमंतांना खासगी कनेक्शनद्वारे घरापर्यंत पाणी पुरवलं जात होतं.
 
अशा पाणी योजनांसाठी आलेला खर्च वेगवेगळ्या ठिकाणांनुसार वेगवेगळा असू शकतो. पण नहर ए अंबरीसाठी 2 लाख लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी 2 लाख रुपये खर्च आल्याचं शेख रमजान यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
 
आजचा विचार करता अशा योजनेसाठी कोट्यवधी खर्च होतात तरीही योजना शक्य होत नाही. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्याच दोन दशकांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या पाणी योजनेचं उदाहरण देता येईल.
 
"सरकारनं गांभीर्यानं विचार करून अशा प्रकारच्या योजनांच्या संदर्भात विचार करायला हवा," असं रमजान शेख यांनी अनेक वर्षांच्या पूर्वी म्हटलं आहे. पण त्याचा फारसा गांभीर्यानं विचार झालेला पाहायला मिळालेला नाही.
 
नहर ए अंबरीचा गेल्या वर्षी देशातील वॉटर हेरिटेज म्हणजे जल वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. पण नंतर मात्र या नहरीच्या संवर्धनासाठी हवे त्या वेगानं प्रयत्न झाले नसल्याचं दिसून आलं आहे.
 
नहरीचे पुनरुज्जीवन शक्य आहे का?
या नहरींचं पुनरुज्जीवन करणं शक्य आहे. त्यासाठी अनेक वास्तुविशारदांनी सविस्तर नकाशे आणि इतर तयारीही केली आहे.
 
अनेक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी औरंगाबाद महानगर पालिकेशी संपर्क केला. त्यानंतर प्रशासनाकडून यात रस दाखवण्यात आला. त्यामुळं प्रदीप देशपांडे यांनी दुरुस्तीसाठी काही ड्रॉइंगही तयार केले. पण पुन्हा हा विषय रखडला आहे.
 
इतिहासकाळापासून या पाण्याचा वापर लोक करत आलेले आहेत. आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये नहरीमध्ये पाणी आहे. काही लोक त्याचा वापरही करतात.
 
वास्तुविशारद धनश्री मिरजकर यादेखील या नहरीच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत.त्यांनी स्वतः या नहरीची स्थिती जाणून घेण्यासाठी या नहरीचे सर्वेक्षण केले आहे.तसंच शोधनिबंधाच्या माध्यमातून या नहरीचं तंत्रज्ञान त्यांनी समोर आणलं आहे.
 
भर उन्हाळ्यातही या नहरीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असतं. या शोधनिबंध लिहिणाऱ्या मिरजकर यांनी स्वतः केलेल्या सर्वेक्षणानुसार अजूनही नहरीमध्ये जवळपास दोन फूट उंचीपर्यंत पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे.
 
आजही किमान एक ते दोन लाख लोकांची तहान या पाण्यानं भागू शकते. पण तरीही इच्छाशक्तीच्या अभावामुळं या ऐतिहासिक वारशाचं संवर्धन केलं जात नसल्याचं दिसून येतं. नहरीतील पाणी वर्षभर उपलब्ध असतं आणि आजही पिण्यायोग्य असू शकतं, असं मिरजकर म्हणतात. तसं नसली तरी त्याच्या शुद्धीकरणाचा किंवा इतर ठिकाणी वापराचा पर्याय उपलब्ध आहे.
 
‘आजही बांधता येतील अशा नहरी’
अभ्यासक रमजान शेख यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार आजही नहरीच्या या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून, 'पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अशा नहरी तयार करण्याचा विचार करण्यास हरकत नाही.'
 
विशेष म्हणजे हवामान बदलाचा धोका असताना हा पर्याय अत्यंत पर्यावरणपूरक आणि तेवढाच कमी खर्चिक असा आहे, असं शेख म्हणतात.
 
शेख यांच्या मते, "संपूर्ण देशात अशाप्रकारच्या पाणी योजना तयार करण्यासाठी उपयोगी अशी भौगोलिक स्थिती असलेला 30 टक्के भूभाग आहे. तर जागतिक पातळीवर जवळपास 20 टक्के भूभाग अशाप्रकारची नैसर्गिक स्थिती असलेला आहे."
 
"त्यामुळं गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असलेल्या या सायफन तंत्राचा वापर त्याठिकाणी करता येऊ शकतो, असंही ते म्हणतात. गावोगावी अशाप्रकारच्या नहरी तयार केल्यास लाखो कोट्यवधीं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढणं शक्य आहे," असं शेख रमजान सांगतात.
 
शाश्वत आणि स्वस्त पर्याय
छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज 140 दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. हे पाणी जायकवाडीतून आणलं जातं. त्यासाठीची यंत्रणा अत्यंत खर्चिक असून शाश्वतही नाही.
 
या पैकी 30 दशलक्ष लीटर पाण्याचा वापर हा गुरे, उद्योग, बागा, बांधकाम अशा कामांसाठी केला जातो. यापैकी काही पाणी जर नहरीसारख्या काही नैसर्गिक स्त्रोतांद्वारे मिळवता आले तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि जायकवाडीवरून पाणी आणण्याच्या यंत्रणेवरील बराचसा ताण कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
 
या नहरीमध्ये उंचावरून पाणी खाली आणलं जातं त्यामुळं ते खर्चिक नाही. त्याउलट जायकवाडीसारख्या प्रकल्पांमधून कमी उंचीवरून पाणी पंपच्या सहाय्याने खेचून आणलं जातं. त्यात वीजेसह इतर गोष्टींमुळं खर्च प्रचंड वाढतो.
 
एकट्या नहर ए अंबरीमधून 175536 गॅलन म्हणजे 667036 लीटर पाणी गररोज मिळू शकतं. म्हणजेच नहरीतून 30 दशलक्ष लीटर पाण्यापैकी अंदाजे 2.22% गरज भागू शकते. त्यातही योग्य प्रकारे दुरुस्ती आणि नियमित देखभाल केल्यास हे प्रमाण 11% टक्क्यांपर्यंत वाढू शकतं.
 
यातून काही प्रमाणात रोजगारही तयार होऊ शकतो.
 
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम किंवा इतर काही कामं करताना नहरींना नुकसान पोहोचल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं संवर्धन करण्यापूर्वी याचं संरक्षण करणं गरजेचं असल्याचं धनश्री मिरजकर सांगतात.
 
छत्रपती संभाजीनगर हे आता स्मार्ट सिटी बनण्याच्या मार्गावर आहे. पण त्याचवेळी जर 400 वर्षे जुन्या या पाण्याच्या आजही जीवंत असलेल्या स्रोताला पुनरुज्जीवन दिलं तर त्यातून पाण्याचा प्रश्न काही अंशी सोडवला जाईलच. त्याचवेळी जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळं असलेल्या या ऐतिहासिक शहराच्या शिरपेचात आणखी एक तुरा नक्कीच खोवला जाईल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments